सिंगापूरला नोकरीला लावतो असे सांगून दोन लाख 94 हजारांची फसवणूक

By Raigad Times    25-Mar-2023
Total Views |
Panvel Job fraud
 
नवीन पनवेल | सिंगापूर मध्ये कंपनीत नोकरीला लावतो असे सांगून जगन्नाथ साहू आणि त्याच्या मित्रांकडून दोन लाख 94 हजार रुपये घेऊन नोकरीला न लावता पैसे परत न दिल्या प्रकरणी आरोपींविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकी सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
 
जगन्नाथ नारायण साहू हा दिवाळे गाव, बेलापूर येथे राहतो. त्याला व त्याचा मित्र टेकलाल राम यांना बाहेर देशात काम करता जायचे होते. त्यानुसार त्यांनी एजंट राहुल गजरे व तेजस्विनी किलणजे यांना फोन केला. यावेळी त्यांनी बाहेर देशात कामाला लावतो त्यासाठी कमिशन द्यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी शेल पेट्रोलियम मॅनेजमेंट एस एचडी, बीएचडी ही कंपनी सिंगापूर मध्ये असून त्यात कामाला लावतो असे सांगितले.
 
यासाठी प्रत्येकी एक लाख 60 हजार रुपये द्यावे लागतील व मेडिकलचे साडेतीन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी दोन लाख 94 हजार रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात दिले. काही दिवसांनी त्यांनी मेडिकल चेकअप केले. तिघांचे पासपोर्ट त्यांनी कामासाठी व विजासाठी मागून घेतले. त्यानंतर पंधरा दिवसात काम होईल असं सांगण्यात आले, मात्र त्यांना नोकरीचा कॉल आला नाही व पैसे देखील परत देण्यात आले नाहीत.
 
फोन केला असता दोन-तीन दिवसात पैसे परत करतो असे सांगितले. व एक लाखाचा चेक दिला. बँकेत जाऊन विचारणा केली असता त्यांच्या खात्यामध्ये पैसे नसल्याचे त्यांना समजले. त्यांच्या ऑफिसमध्ये गेले असता एका महिन्यात पैसे देतो असे सांगितले. मात्र पैसे दिले नाहीत. पासपोर्ट मागितले असता पासपोर्ट परत दिले. त्यामुळे राहुल उर्फ दशरथ गजरे व सहकारी तेजस्विनी किलणजे यांनी नोकरीला लावतो असे सांगून दोन लाख 94 रुपये घेतले व नोकरीला न लावता पैसे परत न करता फसवणूक केली.