Monday, 18 August, 2025

रायगड जिल्ह्यातील ७७ तलावांचे होणार संवर्धन

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती

By Raigad Times    16-Jun-2022
Total Views |
talav
अलिबाग । पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेत तलाव, सरोवर आणि जलशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियान अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ७७ तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुर्नजीवित करणे अशी कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे गट विकास अधिकारी संजय चव्हाण यांनी दिली.
 
 
सरोवर संवर्धन अभियान अंतर्गत एक एकर क्षेत्राचे नवीन तलाव निर्मिती करणे, तसेच एक एकर क्षेत्रात अस्तित्त्वात असणाऱ्या तलावातील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुर्जिनवित करणे यासह तलाव परिसरात वृक्ष लागवड, शौचालय व्यवस्था ही कामे करण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यासाठी ७५ तलावांची कामे हाती घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
 
 
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावरुन अस्तित्त्वात असणारे १३३ तलावांची अमृत सरोवर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोग माध्यमातून आणि शासनाच्या विविध योजना तसेच कंपन्यांच्या विकास निधीतून ७७ तलावांची कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच यामधील बहुतांश कामे १५ ऑगस्ट पर्यंत करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिक यांनी तलाव संवर्धन अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
 
ज्या तलावांच्या संवर्धनाची कामे १५ ऑगस्ट पूर्वी पूर्ण होतील त्या तलावांच्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येणार आहे.