कर्जतला अवकाळीने झोडपले; माथेरानमध्ये रिमझिम

05 Apr 2025 13:16:42
 KARJT
 
कर्जत | कर्जत तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसाने सर्व भागाला झोडपले. तर माथेरानमध्ये तब्बल दोन तास पावसाची रिमझिम सुरू होती. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.कर्जतमध्ये दुपारपासूनच थंडगार वार्‍याची झुळूक आणि सोबत ढगाळ वातावरण यामुळे सायंकाळच्या वेळी अवकाळी पाऊस हजेरी लावणार अशी अटकळ बांधली जात होती.
 
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ढग गडगडू लागले आणि काही वेळातच कर्जत तालुक्याच्या बहुसंख्य भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि वातावरणात थंडगार केले. या अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील विटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून बनवून ठेवलेल्या विटांवर पाण्याचे थेंब पडल्याने विटा खराब झाल्या आहेत. त्या पुन्हा बनविण्याची वेळ व्यवसायिकांवर येणार आहे.
 
भाजीपाला पीक घेणार्‍या शेतकर्‍यांनाही अवकाळी पिकाचा त्रास होणार आहे. यावर्षी आंबा पिक काही प्रमाणात तयार झाले असल्याने या अवकाळी पावसाने फार नुकसान शेतकर्‍यांचे होणार नाही असे कृषी विभाग सांगत आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
 
त्यात दीड ते दोन तास पाऊस सुरू होता. माथेरान शहरातील सर्व भागात पावसाची रिमझिम सुरू होती आणि त्यामुळे पावसाने माथेरानमधील काही दिवस ढगाळ हवामानामुळे वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत झाली आहे. आज मोठ्या प्रमाणात पर्यटक नव्हते; मात्र जे पर्यटक माथेरान शहरात होते त्यांनी अवकाळी पावसाचा भिजून आनंद घेतला.
पेणमध्ये अवकाळी पावसाच्या सरीने उडाली तारांबळ
पेणमध्ये अवकाळी पावसाच्या सरी जोरदार बरसल्याने पेणकारांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते. पेण तालुक्यात शुक्रवारी (४ एप्रिल) सायंकाळी अवकाळी पावसाने शेती आणि फळबागांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि फळबागायतदारांची चिंता वाढली आहे.
 
पेण पूर्व विभागातील दुबार शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी मळणीसाठी ठेवलेले पीक भिजल्याने नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात आंबा आणि काजू यांसारख्या फळबागांवर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम होत आहे. ज्यामुळे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसायावर परिणाम
अवकाळी पावसामुळे वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसायावरही परिणाम होण्याची भीती आहे. हवामान ढगाळ झाल्याने आंबा आणि काजू फळ उत्पादन धोक्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
 
अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या आंबा, भाजीपाला, वीटभट्टी, मिठागरे आणि बांधकाम व्यवसायाला फटका बसला आहे. पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे असणार असून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0