म्हसळा येथील तोंडसुरे गावात भीषण पाणी टंचाईचे संकट , हजारो महिलांचा पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा

11 Mar 2025 17:53:48
 mhasla
 
म्हसळा | रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ लागण्यास सुरुवात झाली असून म्हसळा तालुयातील तोंडसुरे या गावातील विहिरीने मार्च महिन्यातच तळ गाठला असून नद्या ओस पडल्या आहेत. १३.५ कोटी रुपयांची तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना बारगळल्याने योजनेचे तीनतेरा वाजले असून ४ ग्रामपंचायतीमधील ९ वाड्यांना याचा फटका बसला आहे.
 
पाभरे धरणातून पाणी पुरवठा होत असलेली जुनी नळ पाणीपुरवठा योजना पूर्णपणे विस्कळीत झाल्याने ऐन उन्हाळ्यात व होळीच्या सणात पाणीसंकट ओढवल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. १ हंडा पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने सोमवारी (१० मार्च) तोंडसुरे ग्रामपंचायत हद्दीतील ३ वाड्यांतील १ हजारपेक्षा जास्त महिला व पुरुष ग्रामस्थांनी ३ किलोमिटर चालत पाणीपुरवठा कार्यालयांवर शासनाविरोधात घोषणा देत हंडा मोर्चा काढला.
 
पाणीपुरवठा कार्यालयातील अभियंता यांना निवेदन देत या मोर्चेकर्‍यांनी शासनाचा निषेध नोंदवला असून २ दिवसात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले. उप अभियंत जे.यु. फुलपगारे यांच्या लेखी ओशासनानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.
 
याप्रसंगी तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना अध्यक्ष महादेव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, सरपंच सुरेश महाडिक, तीन वाडी अध्यक्ष वामन नाक्ती, सचिव सुदर्शन जंगम, सदस्य प्रकाश लोणशिकर, मोरेेशर जंगम, अनिल जंगम, गाव अध्यक्ष गजानन जंगम, रिना पवार, सुनील शेडगे, उपसरपंच प्रीती पवार, उमेश नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0