पाली-खोपोली महामार्गावर भीषण अपघात; तीनजण ठार

दुचाकीस्वार शाळेच्या बसला धडकल्याने झाला अपघात

By Raigad Times    19-Sep-2024
Total Views |
pali
 
सुधागड | पाली-खोपोली राज्य महामार्गावर बुधवारी (ता.१८) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शाळेच्या बसला एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघाताचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. श्रीराज एज्युकेशन सेंटरची स्कुल बस घोटावडे येथून शाळकरी मुलांना पालीकडे घेऊन जात होती. यावेळी पाली बाजूकडून खोपोलीच्या दिशेने वेगाने आलेला बाईकस्वार स्कूल बसला जाऊन धडकला.
 
या बाईकवर तिघेजण प्रवास करत होते. या तिघांचाही मृत्यू झाला आहे. यावेळी स्कूलच्या पाठीमागून येणार्‍या कारच्या डॅश कॅमेर्‍यात ही सर्व थरारक घटना कैद झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी आदींसह पोलीस उपस्थित होते.
 
यावेळी पोलिसांसह अपघातग्रस्त मदत टीम, अमित खीस्मतराव आदींचे सहकार्य मिळाले. दरम्यान, याच राज्य महामार्गावर दापोडे गावाजवळ मंगळवारी (ता.१७) एनसीसीचे विद्यार्थी घेऊन जाणारी परिवहन महामंडळाची बस व कारचा भीषण अपघात झाला. यावेळी बस बाजूच्या शेतात कलंडली. सुदैवाने ४५ विद्यार्थी थोडक्यात बचावले. या मार्गावरील वाढते अपघात चिंताजनक झाले आहेत.