खारघर-सीबीडी कोस्टल रोडला ग्रीन सिग्नल ; वाहतूक कोंडीतून होणार सुटका

By Raigad Times    21-Aug-2024
Total Views |
alibag  
 
पनवेल | खारघर ते सीबीडी ३० मीटर रुंदीच्या कोस्टल रोड उभारणीला भारत सरकारच्या ‘पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय’ने परवानगी दिल्यामुळे ८ वर्षांपासून रखडलेल्या खारघर ते सीबीडी खाडीकिनारा कोस्टल रोडचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
त्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून कळंबोली, कामोठे आणि खारघरवासियांना नवी मुंबई विमानतळ गाठणे आता सोयीचे होणार आहे.
 
‘सिडको’ने नवी मुंबई प्रकल्प उभारण्याचा संकल्प हाती घेताना तळोजा, कळंबोली आणि खारघरवासियांना नवी मुंबई विमानतळ विना अडथळा जाता यावे यासाठी ‘सिडको’ने खारघर ते सीबीडी खाडीकिनारा ६.९६ किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडसाठी २०१८ साली निविदा काढली काढून २७३ कोटीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र, सदर प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून परवानगीसाठी ‘सिडको’कडून प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला यश मिळत नव्हते.
 
अखेर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या ‘पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय’च्या ‘तज्ञ मूल्यांकन समिती’ने कोस्टल रेग्युलेशन झोननुसार खारघर ते सीबीडी-बेलापूर, सेटर-१५ दरम्यान उभारल्या जाणार्या कोस्टल रोडच्या बांधकामाला परवानगी दिली दिल्यामुळे खारघर ते सीबीडी दरम्यान होणार्‍या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. पुणे-मुंबईकडे जाणार्‍या नागरिकांना नवी मुंबई पामबीच आणि कोस्टल रोडने थेट खारघर टोल नायापर्यंत विना अडथळा येता येणार आहे. खारघर ते सीबीडी सेटर-१५ खाडीकिनारा अंदाजे ६.९६ किलोमीटर अंतराचा कोस्टल रोड आहे. तळोजा- खारघर मधील नागरिकांना सीबीडी, सेटर-११ मार्गे मार्गे नवी मुंबई विमानतळावर विना अडथळा जाता येणार आहे.
 
खारघर-सीबीडी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कोस्टल रोडमुळे खारघर कार्पोरेट पार्क, फुटबॉल स्टेडियमचा प्रवास सुखाचा होणार आहे. खारघर टोल नाकादरम्यान सायन-पनवेल महामार्गावर पूल उभारुन रस्ता केला जाणारा असल्यामुळे भविष्यात खारघर सेटर-१५, १६ ते १८ येथील घरांना अधिक मागणी असणार आहे.