महानेट योजना गतीने पूण करणार-मंत्री डॉ.तानाजी सावंत

By Raigad Times    06-Jul-2024
Total Views |
 mahad
 
मुंबई । महाआयटी कडून राज्यातील 26 जिल्ह्यांची 153 तालुक्यातील सुमारे 12 हजार 513 ग्रामपंचायतींना फायबर ऑप्टिकल केबल नेटवर्कचा वापर करून हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पारदर्शकतेने अंमलबजावणी करण्यात येत असून हे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री प्रा.डॉ तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत उत्तर देताना सांगितले.
 
माहिती तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबविण्यात येणार्‍या ’महानेट’चे काम वेळेत होण्याबाबत विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, महानेट ही योजना राज्यात निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हे काम करताना काही अडचणी आल्यास त्यावर मार्ग काढून कामे पूर्ण केली जात आहेत.
 
गावात काम करताना स्थानिक ग्रामस्थांना.विश्वासात घेतले जात आहे. राज्यात महानेट अंतर्गत 9 हजार 911 ग्रामपंचायतीमध्ये राऊटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. 56 हजार 067 किलो मीटर फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याच्या उद्दिष्टापैकी 50 हजार 499 म्हणजेच 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
 
महाआयटी मार्फत शासनाच्या 38 विभागांच्या 45 सेवांचा नागरिकांना ऑनलाईन लाभ घेता येत आहे. यामध्ये ज्या विभागांच्या योजनांची माहिती अपलोड करणे अद्याप बाकी आहे त्या विभागांना देखील सूचना देऊन लवकरच इतर विभागांच्या योजनांचाही ऑनलाईन लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.