खोपोली । पावसाळ्यात दररोज अचानक वीजपुरवठा खंडीत होत असल्याने संपूर्ण खोपोली शहर रात्रभर अंधारात राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.या गंभीर घटनेविरोधात खोपोली शहरातील सर्व पक्षीय नेते,सामाजिक संघटनांंनी सर्व पक्षीय बैैठकीत संताप व्यक्त केला आहे.
या बैठकीस महावितरणचे अधिकारीही उपस्थित होते.येत्या 30 जुलै पर्यंत खोपोलीचा वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास खोपोलीत महावितरण कंपनीविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी आज दिला आहे. यावेळी अधिकार्यांना सर्व पक्षीय नेत्यांनी धारेवर धरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.यानंतर या बैठकीतून सर्व पक्षीय नेत्यांनी सभात्याग केला.
खोपोलीतील लोहना समाज सभागृहात झालेल्या या बैठकीस माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,डॉ.सुनिल पाटील, माजी नगरसेवक मोहन औसरमल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, आपचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष मनेष यादव, शिंदे गट शहर प्रमुख संदीप पाटील, शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अतुल पाटील, शेकापचे नेते कैलास गायकवाड, रविंद्र रोकडे, वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष दिपक गायकवाड,आरपीआयचे युवक अध्यक्ष रूपेश रूपवते,भाजपचे शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, माजी नगरसेवक राजू गायकवाड, खोपोली व्यापारी संगटनेचे अध्यक्ष कांतिलाल पोरवाल, शिळफाटा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू अभाणी,राजाराम माने रायगड अधीक्षक अभियंता, संजय ठाकूर पनवेल ग्रामीण कार्यकारी अभियंता, महादेव मुंढे उप कार्यकारी अभियंता खालापूर सतीश गडरी उप कार्यलारी अभियंता खोपोली, प्रवीण शेडगे साह्य अभियंता खालापूर यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
खोपोली शहरात अंडरग्राउंड केबल टाकली. पण ती चालू केली नसून करोडो रूपये पाण्यात गेले आहेत.वीज दुरूस्तीसाठी कोट्यावधी रूपयाचा निधी वापरला गेला नसल्याचा आरोप अशपाक लोगडे यांनी केला.जनता विद्यालया समोरील रस्त्याच्या बाजूची वीज ही कधीही तुटू शकतो यामध्ये विद्यार्थ्यांची मोठी दुर्घटना घडू शकतो असा इशारा आरपीआयचे रूपेश रूपवते यांनी दिला.
वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर एक वीज बिले भरणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे दिपक गायकवाड यांनी दिला. वीज वसुलीत खोपोली शहर 1 नबंर आहे.तसेच टाटा कंपनीकडून वीज निर्मिती ही खोपोलीत होत असूनही खोपोलीच्या जनतेचे हाल होत आहेत.
खोपोली शहरासाठी 153 कोटीचा निधी अंडरग्राऊड केबलसाठी उपलब्ध करावा यासाठी शासन स्तरावर सर्व पक्षीय नेते मदत करतील असे आश्वासन दत्ताजीराव मसुरकर यांनी दिले. डॉ.सुनिल पाटील म्हणाले अंडरग्राउंड वीज वाहिनी टाकावी,जंगलातून आलेली वीज लाईन बदलावी,शहरातील वीज पुरवठा वेगवेगळा केल्यास संपूर्ण वीज बंद करू नका.