यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखला पोलिसांच्या बेड्या; हत्येची कबुली

31 Jul 2024 16:15:23
uran 
 
उरण | उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्याकांडाने रायगडसह नवी मुंबई हादरुन गेले आहे. यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख याला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.कर्नाटक येथून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटकेनंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची २५ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २७ जुलै रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तपासात दाऊद शेख याचे नाव पुढे आले होते.
 
त्यामुळे त्याला शोधण्यासाठी पोलिसांच्या चार टीम तयार करण्यात आल्या होत्या. दोन पथके कर्नाटकात गेली होती, तर दोन पथके महाराष्ट्रात आरोपींच्या शोधात होती. दाऊदला कर्नाटकातील अलर गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
 
दरम्यान, माझ्या मुलीला जेवढा त्रास झाला तेवढंच त्यालाही टॉर्चर करून फाशी दिली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रीया यशश्रीच्या आईने व्यक्त केली आहे. २५ जुलैला यशश्री शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर २६ जुलैच्या रात्री या मुलीचा मृतदेह आम्हाला सापडला. त्यानंतर २७ जुलैला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
या प्रकरणात दोन ते तीन संशयितावर पोलिसांना संशय होता. यानुसार पथके करुन नवी मुंबई आणि कर्नाटक या ठिकाणी पोलिसांनी शोध सुरु केला. त्यानंतर दाऊद शेखला अटक करण्यात आली. पोलीस सांगतात, दाऊदचं नेमकं लोकेशन आम्हाला सापडत नव्हतं. त्यानंतर त्याचे नातेवाईक, मित्र या सगळ्यांची माहिती आम्हाला कामाला आली. यातला मोहसिन नावाचा संशयित हा मुलीच्या संपर्कात होता. मात्र त्याने हत्या केलेली नाही. दाऊद आणि यशश्री या दोघांचा काहीही संपर्क नव्हता. त्याची चौकशी आम्ही करतो आहोत.
Powered By Sangraha 9.0