वरई येथे विजेची तार पडून तीन दुभत्या गायी दगावल्या , महावितरणने शेतकर्‍याला नुकसान भरपाई देण्याची मागणी

By Raigad Times    03-Jul-2024
Total Views |
 karjat
कर्जत । कर्जत तालुक्यातील वरई येथे एका शेतकर्‍याच्या तीन दुभत्या गायी विजेची तार अंगावर पडल्याने दगावल्या आहेत. या दुभत्या गायी दगावल्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले असून महावितरण कंपनीकडून भरपाई मिळावी, अशी मागणी कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड यांनी केली आहे.
 
कर्जत छत्रपती शिवाजी नगर मध्ये राहणारे आणि मूळचे वरई येथील मोतीराम ठाकरे यांच्या तीन दुभत्या गायी वरई येथे मंगळवारी (2 जुलै) सकाळी चरायला सोडल्या होत्या. त्यावेळी त्या गायीच्या अंगावर वीज वाहक तार कोसळली आणि कोणालाही काही समजण्याच्या आत त्या तिन्ही गायींचा तडफडून मृत्यू झाला.
 
वीजवाहिनी अंगणावर पडून गायी खाली जमिनीवर कोसळल्याचे पाहून शेतकरी ठाकरे हताश झाले. त्यानंतर तात्काळ महावितरण कंपनीला कळविण्यात आले आणि वीज वाहिनीवरील पुरवठा बंद करण्यात आला. मात्र त्याआधी त्या तिन्ही गायींनी आपले प्राण सोडले होते.
 
त्यामुळे शेतकरी मोतीराम तथा बाळू ठाकरे यांनी महावितरणच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
साधारण एक लाख रुपयांचे नुकसान दुभत्या गायींच्या मृत्यूमुळे झाले असून महावितरण कंपनीने शेतकरी मोतिराम ठाकरे यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड यांनी केली आहे.
 
महावितरणचे कर्जत उप अभियंता प्रकाश देवके यांच्याशी संपर्क साधून शरद लाड यांनी शेतकर्‍याच्या नुकसानीस महावितरणची वीज वाहिनी जबाबदारी ठरली आहे.त्यामुळे महावितरण कंपनीने त्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे. उप अभियंता देवके यांनी दहिवली विभागाचे सहायक अभियंता यांना वरई दुर्घटनेचे पंचनामे करून प्रस्ताव महावितरण कडे पाठवण्याचे सूचना दिल्या आहेत.