सहा वर्षांच्या नेत्राचा संशयास्पद मृत्यू ? शिक्षणासाठी सोडले होते या छोट्याशा जीवाने घर...!

ग्रामस्थ आक्रमक; डॉक्टर, शिक्षक आणि संस्थाचालकांच्या चौकशीची केली मागणी

By Raigad Times    02-Jul-2024
Total Views |
 MANGOV
 
माणगांव । माणगांव तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रमशाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीचा अचानकपणे मृत्यू झाला आहे. नेत्रा लेंडी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. नेत्राचा मृत्यू संशयास्पद असून शाळेचे संचालक, शिक्षक आणि डॉक्टर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नेत्रा भरत लेंडी ही पेण तालुक्यातील बोरावाडी येथील रहिवासी होती.
 
शिक्षणासाठी तिला वनवासी कल्याण आश्रमशाळेमध्ये यावर्षीच प्रवेश देण्यात आला होता. साधारण 15 दिवस ती या शाळेमध्ये आली होती. नेत्राचे काका सदानंद यांनी सांगितले की, शनिवारी 29 जूनला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नेत्राच्या वर्गशिक्षकांनी गावातील परशुराम यांच्या मोबाईलवर फोन करून, नेत्रा आजारी आहे, परंतु आता तिला बरं वाटत असल्याचे सांगून, तुम्ही सकाळी बघायला या, असा निरोप दिला.
 
दुसर्‍या दिवशी नेत्राचे वडील भरत लेंडी हे सकाळीच शाळेत जाण्यासाठी निघाले. ते अर्ध्या रस्त्यात असतानाच, शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या गावातील पांडुरंग नावाच्या व्यक्तीला फोन केला आणि नेत्रा मयत झाल्याची माहिती दिली. या माहितीने नेत्राची आई अक्षरशः कोसळून गेली.
 
गावातील काही ग्रामस्थांसह तिने उपजिल्हा रुग्णालय माणगांव गाठले. नेत्राच्या आकस्मित निधनाने तिचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी एकच आक्रोश केला. कोणालीही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. नेत्राची जर प्रकृती जर गंभीर होती तर तिला डॉक्टरांनी हॉस्पिटलमधून का सोडले? शिक्षकांनी तिला अ‍ॅडमिट न करता का शाळेत नेली? असे प्रश्न उपस्थित केले. तसेच नेत्राचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत, याप्रकरणी डॉक्टर, शिक्षक आणि संस्थाचालक यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.