इयत्ता दहावीत शिकणार्‍या वंदनाच सर्पदंशाने मृत्यू ,कर्जतमधील बेडीसगाव येथील घटना

By Raigad Times    01-Jul-2024
Total Views |
 karjat
कर्जत । कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथे राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. वंदना पारधी असे या मुलीचे नाव असून नुकतीच ती दहावीला गेली होती. हुशार अशा या मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बेडीस गाव येथील वंदना बाळू पारधी ही विद्यार्थिनी मागील वर्षापासून नेरळ येथील आदिवासी वसतिगृह येथे राहून शिक्षण घेत होती.
 
या आदिवासी वस्तीगृहाच्या बाजूच्या विद्या विकास मंदिर शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती.आईला शेतीच्या कामात मदत करण्यासाठी, काही दिवसांपासून शाळेतून घरी बेडीसगाव येथे ये- जाता करीत होती. शुक्रवारी आपल्या घरी पोहचलेली वंदना ही सोमवार पासून वसतिगृहात पूर्णवेळ राहण्यासाठी येणार होती.
 
सर्व कागदपत्र घेवून येते असे सांगून घरी गेलेली वंदना, पुन्हा आपल्या आदिवासी वस्ती गृहात परतली नाही. वंदनाला सर्प दंश झाला. तिला वांगणी येथे रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र वंदना वाचू शकली नाही आणि तिचा मृत्यू झाला. वंदनाच्या मृत्यूने तिच्या आई आणि भावावर दुःखाचे संकट आले आहे.
वंदना पारधी ही विद्यार्थिनी आपल्या आईला शेतीच्या कामात मदत करण्यासाठी मागील काही दिवस घरी ये जा करून शिक्षण घेत होती. ती नववी पासून आमच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे.त्यामुळे आताही ती वसतिगृहात राहत असती तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती. - चंद्रकांत घोडके, अधीक्षक आदिवासी वसतिगृह