महाडमध्ये भटया कुत्र्यांचा हैदोस! नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

By Raigad Times    08-Jun-2024
Total Views |
 mahad
 
महाड | महाड शहरात पुन्हा पिसाळलेल्या भटया कुत्र्यांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली असून दिवस रात्र टोळीने जागोजागी ठाण मांडून बसलेल्या या कुत्र्यांचा जवळून चालत अथवा दुचाकी वरून जाताना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. भटया व कुत्र्यांच्या दहशतीमुळे हैराण झालेल्या महाडकरांकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त महाड नगर परिषदेने करावा अशी मागणी केली जात आहे.
 
महाड शहरात भटया कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मुख्य रहदारीचा रस्ता आणि गल्ली बोळात ही कुत्री टोळी टोळीने वावरत असतात.दिवसा व रात्री अपरात्री एकटा दुकटा येणारा प्रवासी, दुचाकी स्वार यांच्यावर ही कुत्र्यांची टोळी तुटून पडत असते.त्यामुळे अशा कुत्र्यांची टोळी असलेल्या ठिकाणावरून जाता येताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.
 
तांबट आळीमध्ये महाड अर्बन बँकेच्या कर्मचार्‍यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करीत जखमी केले होते.तर काही कुत्र्यांनी रात्री इमारतीसमोर लावलेल्या दुचाकीचे सीट कुशन फाडले आहेत. महाड नगरपरिषदेने शहरातील भटया व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.