महिनाभरात १२०३ बेकायदा झोपड्या जमीनदोस्त , नवी मुंबई मनपाच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

By Raigad Times    08-Jun-2024
Total Views |
 new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्यावतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यावर धडक कारवाई करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कालावधीत मे महिन्यामध्ये आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे.
 
यामध्ये प्राधान्याने डोंगर पायथ्याशी असलेल्या संभाव्य दरडप्रवण क्षेत्रातील झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. महिनाभरात १२०३ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त् डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांच्या सहा.आयुक्त् तथा विभाग अधिकारी यांनी अतिक्रमित झोपडपट्टी हटाव मोहीम प्रभावीपणे राबविली असून मे महिन्यात १२०३ इतया मोठया संख्येने अनधिकृत झोपडया हटविलेल्या आहेत.
 
यामध्ये बेलापूर विभागात दुर्गानगर, पंचशिल नगर,बेलापूर उड्डाणपूलाखाली, से.२८ येथील विठ्ठल मंदिराच्या बाजूला अशा एकूण २५१ अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई केलेली आहे. तसेच नेरुळ विभागात से.९ पाण्याच्या टाकीच्या बाजूला, महात्मा गांधीनगर बालाजी मंदिराच्या बाजूला अशा ९० अनधिकृत झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत.
 
वाशी विभागामध्ये हायटेन्शन वायरच्याखाली,मुंबई - पुणे मार्गालगत वाशी गाव टोलनायाच्या बाजूला अशा दोन ठिकाणच्या ८१८ अनधिकृत झोपडयांवर कारवाई करण्यात आलेली आहे. घणसोली विभागात पामबीच मार्गालगत साईबाबा मंदिराजवळील २७ अनधिकृत झोपडया तसेच ऐरोली विभागात ठाणे बेलापूर रस्त्यानजिक भारत बिजली कंपनी समोरील रेल्वे रुळांनजिक अनधिकृतरित्या वसलेल्या १५ झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे.
 
दिघा विभागातही ईेशरनगर आणि विष्णुनगर येथील २ अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत.
मे महिन्यात पावसाळा पूर्व कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांतील १२०३ अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली असून पावसाळी कालावधीत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास दुर्घटना घडू नये म्हणून डोंगर पायथ्याशी असलेल्या दरड प्रवण क्षेत्रातील झोपडपट्टया हटविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.