लाडवली पुलाजवळील रस्ता पुन्हा पाण्याखाली , मोहोप्रे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

रायगड विभागातील जनतेची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’

By Raigad Times    29-Jun-2024
Total Views |
mahad
 
महाड | महाड तालुयात शुक्रवारी (२८ जून) सकाळपासूनच सुरु असलेल्या धुवाँधार पावसामुळे महाड रायगड मार्गावर लाडवली पुलाजवळ केलेला पर्यायी मार्ग दुपारनंतर पुन्हा पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गे जाणे-येणेचा रायगड खोर्‍यातील जनतेचा मार्ग पुन्हा बंद झाला. या संपूर्ण वाहतुकीचा भार तेटघर मार्गे आचळोली मोहोप्रे रस्त्यावर पडल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे रायगड विभागात राहणार्‍या जनतेची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे.
 
महाड-रायगड मार्गावरील लाडवली पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असून हा पूल पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदार, राष्ट्रीय महामार्ग विभाग व प्रशासनाकडून दिली गेलेली २० जूनची मुदत केव्हाच संपली आहे. यादरम्यान वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे मांडलेकडून येणार्‍या नदीचे पाणी वाढले असून बुधवारी रात्री या पर्यायी मार्गावरून पाणी गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.
 
मात्र दुसर्‍या दिवशी पावसाचा जोर कमी झाल्याने या मार्गावर भराव टाकून पुन्हा हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने मांडले नदीतील पाणी वाढून हा मार्ग पुन्हा पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरुन पाणी वाहत असतानाही काही नागरिक आपली वाहने या पाण्यातून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
तर काही नागरिक पायी या पाण्यातून जात आहे. मात्र नदीतील पाण्याचा प्रवाह जर वाढला तर एखादे वाहन अथवा इसम या प्रवाह वाहत जाऊन एखादी दुर्घटना घडण्याची शयता नाकारता येत नाही. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवून येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता आहे.
 
महाड रायगड रस्ता बंद झाल्याने रायगड विभागात जाणारी येणारी सर्व वाहतूक मोहोप्रे आचळोली मार्गे सुरु झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून त्यातून मार्ग काढून ये-जा करणे रायगड विभागातील जनतेसाठी गैरसोयीचे ठरत आहे.