काशिद येथील बंदीकडे पर्यटकांचे दुर्लक्ष,पोलीस, सुरक्षारक्षकांनी पाठवले माघारी; समुद्रात न जाण्याचे आवाहन

By Raigad Times    24-Jun-2024
Total Views |
 korlie
 
कोर्लई | पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशिद किनार्‍यावर पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंदी घोषित करण्यात आली आहे. मात्र याकडे पर्यटकांकडून दुर्लक्ष होत असून, या विकेंडला पर्यटकांची पावले या किनार्‍यावर वळल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी त्यांना परतीचा मार्ग दाखवला.
 
अलिबाग -मुरुड रस्त्यावर जगाच्या पटलावर नावारूपाला आलेला काशिद समुद्रकिनारा पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत तसेच सुरक्षेच्या उपायासंदर्भात रस्त्यालगत सूचना फलक लावण्यात आले आहेत.
 
पर्यटकांनी सूचनांचे पालन करुन समुद्रात जाऊ नये.असे आवाहन ग्रामपंचायत, ग्रामस्थ, स्टॉलधारक, मुरुड पोलीस यांच्यावतीने करण्यात आले आहे. येथील विविध खाद्यपदार्थ, खाद्यपेय स्टॉल्स दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात यंदा १८ जून ते १४ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहेत.
 
जून महिन्याच्या विकेंडला रविवारी पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी असूनही पर्यटकांची पावले काशिद-बिचकडे वळल्याचे चित्र दिसून येत होते. येथे सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन पोलिस, तीन सुरक्षा रक्षक तसेच पार्किंग सदस्य आपली कामगिरी चोख करीत पर्यटकांना मार्गदर्शन करीत होते.