खालापुर येथे 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू,मुंबई बांद्रा येथील रिझवी कॉलेजचे सर्व विद्यार्थी

पावसाळी पर्यटनासाठी आले होते 37 विद्यार्थी

By Raigad Times    22-Jun-2024
Total Views |
KHALAPUR
 
खोपोली । पावसाळी पर्यटनासाठी खालापूर येथे आलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या चारहीजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे सर्वजण मुंबईतील रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
 
मुंबई बांद्रा येथील रिझवी कॉलेजचे 37 विद्यार्थी शुक्रवारी खालापूर तालुक्यात सोंडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते. 37 जणांच्या या ग्रुपमध्ये 17 मुली होत्या. किल्ल्यावरुन परतत असताना, धावडी नदीच्या बंधार्‍यावरील सांडव्याखाली डुंबण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
 
त्यामुळे हे सर्व विद्यार्थी भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तिथे थांबले. मात्र बंधार्‍यावरील पाण्याच अंदाज न आल्याने 4 विद्यार्थी बुडाले. चार ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. एकलव्य सिंग, ईशांत यादव, आकाश माने, रणत बंडा अशी मृत युवकांची नावे आहेत.
 
खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे स्वतः घटनास्थळी होते. मृत तरुणाचे मृतदेह चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत.