रोहा-दिवा पॅसेंजर निडी ग्रामस्थांनी अडवली; रस्त्यासाठी केले आंदोलन

By Raigad Times    18-Jun-2024
Total Views |
 roha
 
रोहा । रोहा तालुक्यातील निडी गावाला पर्यायी रस्ता द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी (17 जून) रेल्वे रोको आंदोलन केले. गावातील महिला, पुरुष रुळावर उतरले होते. त्यामुळे सायंकाळी साडेचार वाजता सुटणारी रोहा-दिवा पॅसेंजर अर्धा तास अडकून पडली होती. रेल्वे प्रशासनाने समजून काढल्यानंतर ही पॅसेंजर मार्गस्थ झाली.
 
निडी येथील गेट क्रमांक 49 रेल्वे प्रशासनाने बंद करण्यात आला आहे. गावकर्‍यांसाठी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे प्रशासनाने भोगदा खोदुन रस्ता करुन दिला होता; परंतु पावसाळा सुरू झाल्यामुळे या बोगद्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ये-जा येण्यासाठी मोठी अडचणी निर्माण झाली.
 
रेल्वेने दिलेला मार्ग गैरसोयीचा ठरत असल्यामुळे सोमवारी ग्रामस्थांनी रोहा दिवा रेल्वे अडवून धरली. जोपर्यंत ग्रामस्थांना पर्यायी मार्ग दिला जात नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहिल अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. परिणामी रोहा-दिवा रेल्वे अर्धा तास जागच्या जागी उभी होती. परिणामी प्रवाशांचा खोळंबा झाला.
 
दरम्यान, पर्यायी मार्गाचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत ग्रामस्थांसाठी निडी फाटक गेट क्रमांक 49 खुला ठेवण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिले. यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे, तसेच रेल्वे यांची समयसूचकतेमुळे रेल्वे वाहतूक वेळीच सुरळीत झाली.