शिवतीर्थावर महायुतीचा झेंडा फडकवणार,खासदार सुनील तटकरे यांचा निश्चय

By Raigad Times    17-Jun-2024
Total Views |
 mangoan
 
माणगाव | विरोधकांना त्यांची जागा आपल्याला दाखवायची असून रायगड जिल्हा परिषद अलिबागच्या शिवतीर्थावर महायुतीचा झेंडा फडकविल्याशिवाय आता आपण गप्प बसायचे नाही, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.सुनील तटकरे यांच्या विजयानंतर महायुतीतर्फे माणगाव येथे शनिवारी (१५ जून) सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
 
यावेळी त्यांनी महायुतीचे आम्ही सर्व नेतेमंडळी चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत संविधान बदलता येणार नाही, असे सांगत होतो. पण विरोधकांनी महायुतीचे सरकार आल्यावर हे संविधान बदलले जाईल, असे जनतेच्या मनावर बिंबवले होते.जनतेच्या मनातून हे सर्व काही काढून टाकण्यात आपल्याला अपयश आले.
 
अनंत गीतेंनी आपल्याराजकीय आयुष्यात समाजावर मते मागण्याचे काम केले. या निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. ८२ हजाराहून अधिक मतांनी आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने निवडून आलो. मला अलिबाग, पेण मतदारसंघातून भरपूर मताधिय मिळाले. श्रीवर्धन मतदारसंघातूनही २९ हजारांचे मताधिय मिळाले.
 
महाड मतदारसंघातून ३७०० मतांची आघाडी असली तरी या मतदारसंघात आ.भरत गोगावले यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली ते आपण पाहिले. दापोली, गुहागर मतदार सांघातूनही महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. सुनील तटकरे केवळ राष्ट्रवादीचा खासदार नव्हे तर महायुतीचा खासदार म्हणून काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
 
विधानसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातील आपल्याला सर्व सातही जागा जिंकायचे असून अलिबाग शिवतीर्थावर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. भरत गोगावले यांनी, समाजावर कधी राजकारण चालत नाही.
 
महाड मतदार संघातील असे कुठले वाडी-वस्ती गाव दाखवा जेथे भरतशेठचे काम नाही. जनतेच्या अडी-अडचणी, प्रसंगाला आम्ही मंडळी धावून जातो, मदत करतो. मग अजून आम्ही काय करायला हवे? असा सवाल करीत येणार्‍या सर्वच निवडणुकांत महायुतीचे नाते सर्वांनी घट्ट ठेऊन हातात हात घालून काम करुया असे आवाहन त्यांनी केले.