तक्का येथून १३५ किलो गांजा हस्तगत , पनवेलमध्ये राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; दोघे गजाआड, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

17 Jun 2024 17:53:45
 Panvel
 
पनवेल | पनवेलजवळील तक्का येथे रविवारी (१६ जून) राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ पनवेल विभागाने केलेल्या कारवाईत ४५ लाख रुपये किमतीचा १३५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. दोन दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
 
पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग समोर, तळोजे पाचनंद, से. नं. ४० येथे २ दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत १ कोटी रूपये किंमतीचा ४१४ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 
तळोजे येथील कारवाईत अटक केलेल्या दोघांना कार्यालयात चौकशीसाठी आणले असता परवेझ शेख याच्या मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला. तो ‘‘अंकल मी पनवेल येथे माल घेऊन आज सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्यादरम्यान ईनोव्हा गाडीने येत आहे’’ असे बोलला.
 
सदर इसमाशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनीसुध्दा ते अंकलच आहेत असे भासवून, त्याला तू सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई-पुणे रोडवर पंचमुखी मारूती मंदिरसमोर ये, असे सांगितले. त्यानुसार घटनास्थळी हनोझ होशी इंगीनीर (इंजिनियर, रा. लोणावळा) व दिवा उंबरे हे इनोव्हाने मालासह तक्का पनवेल येथे आले व अलगदपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळयात अडकले.
 
त्यांच्या ताब्यात १३५ किलो गांजा सापडला. या गांजासह वाहनही जप्त करण्यात आले असून, एकूण ४५ लाख ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी दोघांविरोधात एन.डी. पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २०(ब)(१), २९ तसेच भा. द. स. कलम ३२८ प्रमाणे अटक करण्यात आली आहे.
 
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे उपायुक्त प्रदिप पवार, राज्य उत्पादन शुल्कचे रायगड अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, दुय्यम निरीक्षक कृष्णा देवरे, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, दुय्यम निरीक्षक गणेश कुदळे तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, सखाराम पवार यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0