उरण | आपल्या आईच्या कुशीत बसलेल्या पाच महिन्यांच्या बाळाला जन्मदात्या बापाने हिसकावून घेऊन जमिनीवर आपटल्याची दुर्दैवी घटना बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (९ जून) घडली. या घटनेसंदर्भात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून राक्षसी वृत्तीच्या नराधम बापाला उरण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमृता खुशीराम ठाकूर ही विवाहित महिला पती खुशीराम गजानन ठाकूर सोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत काही दिवसांपासून राहत होती. या अपत्याला रुही नावाची मुलगी होती. ती पाच महिन्यांची होती. अमृता व तिचे पती खुशीराम यांच्यात रविवारी दुपारच्या सत्रात भांडण झाले.
त्यामुळे अमृता आपल्या पाच महिन्यांच्या मुलीला घेऊन शेजारी राहत असलेल्या आपल्या नातेवाईक बिन्नीलाल बुधा राम यांच्या घरी गेली.मात्र खुशीराम ठाकूरने अमृताच्या मागेमागे जाऊन ‘हमारी लडकी दे दो’ असे बोलत मुलगी घेण्यावरुन पुन्हा भांडण सुरू केले.
यावेळी आपल्या कुशीत बसलेल्या आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला देण्यास आई अमृताने विरोध केला असता खुशीरामने रुही या तान्ह्या बाळाला आईच्या ताब्यातून हिसकावून घेऊन जमिनीवर आपटले. या घटनेत रुहीच्या डोयाला गंभीर दुखापत झाल्याने ती मरण पावली आहे.
या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच त्यांनी खुशीराम गजानन ठाकूर याला ताब्यात घेतले आहे. याबाबत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.