रायगड विभागातील नागरिकांचा रास्ता रोको , ४० गावांचा संपर्क तुटण्याची शयता

By Raigad Times    11-Jun-2024
Total Views |
 mahad
 
महाड | महाड-रायगड मार्गावरील लाडवली येथील गांधारी नदीवरील पुलाचे काम रखडल्याने पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होऊन, रायगड विभागातील सुमारे चाळीस गावांचा संपर्क तुटण्याची शयता आहे. महामार्ग विभाग आणि पुलाचा ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळेच या पुलाचे काम रखडल्याचा आरोप करित आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत रायगड विभागातील संतप्त नागरिकांनी सोमवारी (१० जून) या पुलावरच हा मार्ग रोखून धरला.
 
महाड-रायगड मार्गला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. किल्ले रायगडसह रायगड विभागातील सुमारे चाळीस गावांना दळणवळणासाठी हा एकमेव मार्ग आहे. या मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. ठिकठिकाणी कामासाठी खोदलेला रस्ता आणि अपूर्ण काम यामुळे या मार्गावरील वाहतुकीला प्रचंड अडथळे येत आहेत.
 
पाऊस पडल्यानंतर या अर्धवट स्थितीतील महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यातून वाहने हाकताना सातत्याने छोटे- मोठे अपघात होत असतात. भरीस भर म्हणून या मार्गावर लाडवली या गावाजवळ असलेला जुना ब्रिटीशकालीन पूल काही महिन्यांपूर्वी पाडण्यात येवून या ठिकाणी नवा पूल बांधण्याचे काम सुरु करण्यात आले.
 
या ठिकाणी नदीपात्रातून तात्पुरता पर्यायी मार्ग काढून वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र केवळ पन्नास टक्केच काम पूर्ण झाले आहे. पुलावर गर्डर टाकण्याचे काम शिल्लक आहे. नियमित पाऊस सुरू झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात नदीपात्रातून काढण्यात आलेला पर्यायी मार्ग पाण्याखाली जाणार आहे.
 
त्यामुळे चाळीस गावांचा महाडशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटणार आहे. वाहतूक बंद पडल्यास महाडमध्ये दैनंदिन कामासाठी येणारे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, आजारी व्यक्ती यांना घरामध्येच बसावे लागणार आहे. या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी या विभागातील नागरिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सातत्याने करित होते.
 
महामार्ग विभाग आणि ठेकेदाराने मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या रायगड विभागातील नागरिकांनी सोमवारी लाडवली पुलाजवळच रस्ता रोखून धरला. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, महेश शिंदे, शिवसेनेचे (शिंदेगट) बंधू तरडे यांच्यासह या विभागातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्ग विभागाचा एकही जबाबदार अधिकारी महाडमध्ये नसल्याने ते या आंदेलनाकडे फिरकले नाहीत.
 
महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि शहर पोलीस निरिक्षक रमेश तडवी हे घटनास्थळी दाखल झाले. काळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आपण आज (११ जून) महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावली असल्याचे सांगत त्यांनी हे आंदोलन थांबविण्याचे आवाहन नागरिकांना केले.
 
मात्र संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीवर आंदोलक ठाम राहिले. अखेर तुम्ही तक्रार द्या, आम्ही गुन्हा दाखल करतो असे काळे यांनी सांगितल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर सर्व आंदोलकांनी डीवायएसपी काळे यांच्यासह महाड प्रांत कार्यालयात जाऊन त्यांच्याशीही या समस्येबद्दल चर्चा केली.