उरणमध्ये दोन महिने मासेमारी बंद,बोटी विसावल्या समुद्र किनार्‍यावर

By Raigad Times    10-Jun-2024
Total Views |
 uran
 
उरण | १ जून ते ३१ जुलै पर्यंत शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी ६१ दिवसाच्या मासेमारी बंदीच्या आदेशा नंतर मासळीची आवक घटली आहे. या मुळे मात्र मासळीचे भाव चांगलेच कडाडले आहेत.त्यामुळे जिल्ह्याभरातील मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता कोळी बांधवांनी आपल्या बोटीकिनारी आणून शाकारणी केली आहे.
 
करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड, खोपटा, व वशेणी गव्हाण आदि ठिकाणी बंदरावर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजाराहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यामध्ये ण काही नौका यांत्रिकी तर काही बिगर यांत्रिकी आहेत. ३१ मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता आता पुढील दोन महिने या बोटीत किनार्‍यावर विसावल्या आहेत.
 
त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून न पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. बदलते हवामान, सांडपाण्यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश असा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते.
 
तरी देखील जिल्ह्यातील मच्छीमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. जून महिन्यात पावसामुळे उधाणा बरोबरच वारा,वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. खोल समुद्रात मासेमारी करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.
 
मासेमारी बंदीमुळे मच्छीमारांनी नौका किनारी लावण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्हा सह करंजा व मोरा या बदरांवर बोटी नांगरण्यात आल्या असून काही ठिकाणी नांगरण्याचे काम आजही सुरू आहे. अनेकांना जीव देखील गमवावा लागतो. तसेच पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादन कालावधी असतो.