एसटीत चढताना वृद्ध महिलेची पर्स चोरली!पोलादपूर एसटी स्थानकातील घटना

By Raigad Times    10-Jun-2024
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | पोलादपूर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक आवारात एका वयोवृध्द प्रवासी महिला गावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटयाने महिलेची पर्स लंपास केली. यानंतर चोरट्याने पलायन केले असून या घटनेनंतर पोलादपूर पोलीसांनी एस.टी.स्थानकामध्ये महिला व पुरूष पोलीस कॉन्टेबल्स तैनात करून बंदोबस्त वाढविला आहे.
 
शुक्रवारी ७ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. चोरांकडून सरकारी सवलतीत प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांना लक्ष्य करण्यासाठी एस.टी.बसस्थानकामध्ये चोर्‍या केल्या जात असून पोलादपूर स्थानकातील गेल्या महिनाभरातील ही दुसरी चोरीची घटना असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
७ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलादपूर एस.टी. बस स्टँड परिसरात महिला फिर्यादीे पोलादपूर ते साखर खडकवाडी असा प्रवास करण्यासाठी एस.टी बसमध्ये चढत असताना गर्दीतून त्यांच्या पर्समधून दोन पॉकेटमध्ये असलेले २६ हजार रूपये व इतर कागदपत्र व आधारकार्ड कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे वृध्दापकाळाचा फायदा घेवून चोरली.
 
यानंतर चोराने पोबारा केला. गेल्या महिनाभरातील पोलादपूर एसटी बस स्थानकात घडलेली चोरीची दुसरी घटना असून एसटी बस स्थानकात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.पोलादपूर शहरातील खासगी बस थांबण्याच्या ठिकाणी महिला प्रवाशांची संख्या कमी असल्याने त्याठिकाणी चोरटयांकडून कोणत्याही प्रकारच्या चोरीचे प्रकार घडत नसून केवळ पोलादपूर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक आवारात सरकारी सवलतीच्या दरात प्रवास करणार्‍या महिलांवर चोरांचा डोळा असल्याचे दिसून आले आहे.
 
यापुर्वी एका वृध्द महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडयांची अज्ञात इसमाने चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे येथे गु.र.रजि.नं.६४-२०२४ भा.दं.वि.क.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील कदम करीत आहेत.