सदोष मतदार यादीमुळे अनेक मतदार राहिले मतदानापासून वंचित

By Raigad Times    09-May-2024
Total Views |
 alibag
 
महाड | मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतू दुसर्‍या बाजूला सदोष मतदार यादीचा फटका अनेक मतदारांना बसला. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पहायला मिळाल्या.
 
अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती.दुसरीकडे अनेकांकडे मतदान काड होते, पण मतदारयादीत नावेच नव्हती. अनेकांच्या नावातील बदलामुळे त्यांना मतदान करता आले नाही.अलिबाग कुरुळ येथील कल्पना शांताराम पाटील या ९० पार महिला मतदाराला या तांत्रिक चुकीचा फटका बसला. त्यांच्याकडे मतदान कार्ड होते.
 
त्यामुळे त्या मतदान करण्यासाठी निघाल्या;परंतू मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदान करण्यापासून वंचित रहावे लागले. अलिबागमधील वैभव जैन यांचेदेखील मतदार यादीत नाव नव्हते, त्यांनाही मतदान केंद्रावरुन मतदान न करताच परतण्याची वेळ आहे.
 
महाड शहरातील सरेकर आळी येथील काही मतदार हयात असतानाही त्यांना मयत दाखविले गेल्याने त्यांना मतदान करता आले नाही. याचवेळी जे मतदार खरोखर मयत आहेत, त्यांची नावे मात्र मतदार यादीतून वगळण्यात आली नव्हती. काहींकडे मतदान ओळखपत्र असतानाही त्यांची नांवे मतदान यादीतून गायब झाली होती.
 
त्यामुळे अशा मतदारांनाही मतदानाचा हक्क.हक्क बजावता आला नाही. महाडमधील एका शासकीय कर्मचार्‍याला मतदानाची ड्युटी लावली होती; मात्र मतदान यादीत त्यांच्या मुलाची नावासमोर इलेशन ड्युटी अशी नोंद केली असल्याने, सर्व पुरावे सादर करूनदेखील त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
 
अशा प्रकारच्या अनेक तक्रारी रायगड मतदारसंघात पहायला मिळाल्या.मतदान झाल्यानंतर आता एक एक तक्रारी पुढे येत आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी होऊन मतदार यादीत दुरुस्तीदेखील केली जाईल. मात्र अशा सदोष मतदार याद्यांमुळे या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यापासून मुकावे लागले, याची हळहळ या मतदारांनी व्यक्त केली आहे.