कोकण पदवीधरची निवडणूक जाहीर ! १० जून रोजी मतदान; १३ जूनला मतमोजणी

By Raigad Times    09-May-2024
Total Views |
 MUMBAI
 
मुंबई | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.
 
विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ),निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत.
 
त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे.
 
सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल.गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल.ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे
कळविले आहे.