कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचा व्हिडीओ करणे पडले महागात , रेवदंडा येथील तरुणाविरोधात गुन्हा

By Raigad Times    09-May-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रेवदंडा येथील एका मतदान केंद्रावर मतदान करताना स्वतःचे व्हिडीओ शुटींग करुन स्टेटस ठेवणे एकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान घेण्यात आले.
 
रेवदंडा येथील प्रसाद शरद गोंधळी हा रेवदंडा येथील मतदान केंद्र क्रमांक २४४ येथे मतदान करण्यासाठी गेला होता. मतदान करताना त्याने एका विशिष्ट उमेदवारास मतदान करीत असल्याचा व्हिडीओ बनवून इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केला.भारतीय मतदान हे अत्यंत गुप्त पद्धतीने करायचे असते.मात्र अशाप्रकारे ते सार्वत्रिक करणे या तरुणाच्या अंगलट आले आहे.
 
यामुळे मतदान प्रक्रियेतेतील गुप्ततेचा भंग केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस नाईक सिध्देश शिंदे यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली असून याबाबत सी.आर.पी.सी.१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले पुढील तपास करीत आहेत.