मित्राकडून वापरायला घेतलेली कार ठेवली गहाण , पनवेल तालुक्यातील कानपोली, हेदूटणे येथील घटना

By Raigad Times    09-May-2024
Total Views |
 panvel
पनवेल | काही दिवस वापरण्यासाठी दिलेली कार परस्पर गहाण ठेवून, तिचा अपहार केल्याची घटना पनवेल तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात वाल्मीक गोपाळ यांच्या तक्रारीवरुन, कमलेश वरसाळे याच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वाल्मीक भागवत गोपाळ हे कानपोली,हेदूटणे येथे राहतात. ते धार्मिक विधी पूजापाठचे काम करतात. त्यांची ओळख कमलेश वरसाळे (रा.नवीन पनवेल) यांच्याशी झाली. मार्च महिन्यात कमलेश हा वाल्मीक गोपाळ यांच्या घरी आला आणि त्यांच्या बहिणीचे पती आर्मीमध्ये असून त्यांना पनवेल ते मंत्रालयात जाण्यासाठी कार पाहिजे असल्याने पाच दिवसांसाठी कार पाहिजे असल्याची विनंती केली त्याच्यावर विश्वास ठेवून, वाल्मीक यांनी विेशासाने आपली कार कमलेश यांना दिली.
 
पाच दिवस झाल्यानंतर त्यांनी त्यांची कार घरी घेऊन येण्याबाबत सांगितले. मात्र कमलेशने आणखी दहा दिवस कार वापरण्यास हवी असल्याचे सांगितले. दहा दिवसांनंतर फोन केला. यावेळी १७ एप्रिल रोजी कार ताब्यात देतो सांगण्यात आले.त्यानंतर फोन बंद येऊ लागला.
 
काही दिवसांनी कमलेश वरसाळे यांच्यासोबत संपर्क झाला असता कार गहाण ठेवली असल्याचे कमलेशने सांगितले. त्यामुळे वाल्मीक यांना धक्का बसला. १७ लाख रुपये किमतीची किया कंपनीची कार परस्पर गहाण ठेवून कारचा अपहार केल्याप्रकरणी वाल्मीक यांच्या तक्रारीवरुन कमलेश वरसाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.