जेएनपीटीमध्ये अडकला ४०० कंटेनर कांदा ! सडण्याची भीती; व्यापार्‍यांना बसतोय फटका

By Raigad Times    09-May-2024
Total Views |
 uran
 
उरण | केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्पापूर्वी राज्यातील शेतकर्‍यांना गिफ्ट दिले होते. चार महिने २७ दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवली.४० टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली.
परंतु त्यानंतर अडचणी काही सुटत नाही.निर्यातबंदीचा निर्णय मागे घेऊन चार दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे कांद्याचे ४०० कंटनेर बंदरावरच अडकले. त्याचा फटका व्यापार्‍यांना बसत आहे.
 
शेतकर्‍यांसाठी कांदा आणि टॉमेटो ही पिके नेहमी अडचणीची ठरतात. कधी अवकाळीचा फटका तर कधी बाजारभावाचा धोका या पिकांना बसतो. कमी उत्पन्न होताच दर वाढू नये म्हणून सरकारकडून निर्यातबंदी केली जाते.यामुळेच जवळपास पाच महिन्यांपासून कांद्याच्या निर्यातीस बंदी होती.
 
अखेर ही बंदी ३ मे २०२४ रोजी मागे घेतली गेली. त्यासंदर्भातील आदेश आला. परंतु जेएनपीटी आणि कस्टम विभागाची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे गोंधळ उडाला.चार दिवसांपासून वेबसाईट अपडेट झाली नसल्याने जवळपास ४०० हून अधिक कांद्याचे कंटेनर मुंबईच्या जेएनपीटीमध्ये अडकले. यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवल्यानंतर देखील कांद्याचा वांदा सुरूच आहे.
 
कांदा निर्यातबंदीसंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्टता नव्हती. यामुळे ही वेबसाईट अपडेट व्हायला उशीर लागला.तांत्रिक अडचणीमुळे नाशिकच्या जामोरीतील दीडशे ते पावणेदोनशे कंटेनर जेएनपीटी बाहेर अडकले. कंटेनर खोळंबल्याने जहाजाचे भाडे देखील वाया गेले. त्याचा फटका व्यापार्‍यांना बसला आहे. सदरचा कांदा सडण्याची भीती वाटत आहे.