दहा मतदान केंद्रांवर शुकशुकाट...बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

By Raigad Times    08-May-2024
Total Views |
 pen
 
पेण | ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान करण्यास सुरुवात झाली; परंतु पेण तालुयातील बाळगंगा धरण प्रकल्पातील ६ ग्रामपंचायतीतील ९ गावे, १३ आदिवासी वाड्यांतील मतदारांनी मतदान केले नाही. या भागातील तब्बल १० हजार मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
 
प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार कायम असल्याने जावळी, निफाड, वरसई, करोटी, निधवळी, वाशिवली, जाभूळवाडी, घोटे, अशा दहा मतदान केंद्रांवर शुकशुकाट पहावयास मिळाला.बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची मनधरणी करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, कोकण पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता संजय जाधव, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे अधिकारी आले;परंतू प्रकल्पग्रस्त शेतकरी बहिष्कारावर ठाम होते.
 
बाळगंगा धरणाच्या कामाला सुरुवात करून १३ वर्षे होत आली तरीसुध्दा ३ हजारहुन अधिक कुटुंबांना शासनाने वार्‍यावर सोडले आहे. तसेच या भागात आजपर्यंत कोणत्याच गावाचे पुनवर्सन झालेले नसल्याचे प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात आले.