निजामपुरात जनतेच्या तोंडचे पाणी पळाले!पूर्वीची योजना कोरडी, सुधारित योजना अपूर्ण, तिसर्‍या योजनेच्या कामाला मुहूर्त सापडेना

By Raigad Times    07-May-2024
Total Views |
 mangoan
 
माणगाव | ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निजामपूर ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा गेले महिनाभरापासून कमी प्रमाणात सोडले जात असून अनेक वेळा कधी तांत्रिक बिघाड तर कधी पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत पाणी नसल्याने निजामपूरकरांना निमूटपणे पाणीटंचाईचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निजामपुरात जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून बोलताना व्यक्त होत आहे.
 
निजामपूरला ४० वर्षांपूर्वी काळ नदीवरील विरोधा येथील विहिरीतून पाणीपुरवठा केला जात होता. वाढत्या शहरीकरणाबरोबरच नागरिकीकरणही मोठ्या झपाट्याने वाढत असल्याने पाण्याचाही प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. या शहराला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे म्हणून अनेक योजना राबविल्या. सध्या ही योजना कोरडी पडली. तर सुधारित पाणी योजना अर्धवट स्थितीत आहे.
 
त्याचबरोबर नव्याने विळे-भागाड एमआयडीसी प्रमाणे रवाळजे डॅमच्या पाण्यावर नवीन २८ कोटी रुपयेची योजना मंजूर केली. या योजनेचे सप्टेंबर महिन्यात भूमिपूजन करण्यात आले. मात्र अद्यापही या योजनेचे काम सुरु झाले नसल्याने एक ना धड, भाराभर चिंध्या, अशी स्थिती झाली आहे.
 
राज्यात दुष्काळी परस्थिती असतांनाच रायगड जिल्ह्यालाही पाणी टंचाईच्या झळा चांगल्याच बसू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यात एवढा पाऊस दरवर्षी पडतो कि ते पाणी समुद्राला जाऊन मिळते, मात्र या पाण्याची नियोजन व्यवस्थित केल्यास रायगडचे काश्मीर होईल, अशी नागरिकांना आशा आहे. अख्ख्या महाराष्ट्राला पाणीपुरवठा होईल एवढी क्षमता केवळ रायगड जिल्ह्यात पडणार्‍या पावसात आहे.
 
लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळेच या पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले जात नाही. त्याला शासन तर जबाबदार आहेच, त्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत.दोघांच्याही अक्षम्य दुर्लक्षातेमुळे निजामपूरच्या जनतेवर भीषण पाणीटंचाईचे संकट येऊन ठेपले आहे.
 
काळ नदीवर उभारलेला विरोधा येथील बंधारा एक महिन्यापूर्वी कोरडा पडला तर याच नदीवर असणारे कोशिंबळे धरणही कोरडे पडल्याने निजामपूर व परिसरातील अनेक गाव-वाड्यांतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. ही काळ नदी पूर्ण कोरडी पडल्याने या पाणीटंचाईशी सामना कसा करावयाचा, हा मोठा प्रश्न उभारला आहे.
 
सध्या पहूर येथील धरणाचे पाणी काळ नदीपात्रात सोडले असून ते पाणी विरोधा येथील पाणीपुरवठा विहिरीत येईपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. माणगाव तालुयातील निजामपूर येथे सुमारे १६ हजार लोकसंख्या असून गेल्या अनेक वर्षांपासून काळ नदीवर विंधनविहीर खोदून तेथून हाऊसपंपाद्वारे साठवण टाकीत पाणी सोडले जाते. त्या साठवण टाकीतून निजामपूर व परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो.
 
याच काळ नदीवर ४५ वर्षांपूर्वी कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधला होता व या काळ नदीचे पाणी बंधार्‍यायात साठवले जात होते. त्यामुळे नागरिकांना विरोधा येथील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. या बंधार्‍याची अनेक वर्षे दुरूस्ती न केल्याने हे पाणी वाहून गेले. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून निजामपूरकरांच्या पदरी पाणी टंचाई पडत आहे. निजामपूर व परिसरातील चार महसूल गावे १० वाड्या व निजामपूर बाजारपेठ अशी मिळून १६ हजार लोकसंख्या आहे.