खासदाकीच्या निवडणुकीत रायगडात आमदारांचा कस

By Raigad Times    07-May-2024
Total Views |
 pen
 
पेण | रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होणार आहे. निवडणुक लोकसभेची असली तरी या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार-सहा महिन्यांनंतर होणार्‍या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
 
त्यामुळे सर्वच आमदारांनी मतांचा जोगवा आपल्या उमेदवारांच्या पदरात पाडण्यासाठी जोर लावला आहे.रायगड लोकसभा मतदार संघात पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी गुहागर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे.
 
तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे भास्कर जाधव हे गुहागरचे आमदार आहेत. तर पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि दापोली मध्ये महायुतीचे आमदार आहेत. पेण येथे भाजपचे आमदार रविंद्र पाटील, अलिबाग येथे शिवसेनेचे आमदार (शिंदे गट) महेंद्र दळवी, श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाकच्या ) आमदार आदिती तटकरे, महाड येथे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले, आणि दापोलीतून शिवसेना (शिंदे गटाचे) योगेश कदम आमदार आहेत.
 
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने या दोन प्रमुख पक्षांची ताकद दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आपले अस्तित्व आणि मतदारसंघावरील ताकद दाखविण्याची संधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने चालून आली आहे. चार-सहा महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्याने लोकसभा निवडणूकही आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
प्रत्येक आमदारांना आपआपल्या मतदारसंघातून मताधिय देणे क्रमप्राप्त असणार आहे. अन्यथा चार-सहा महिन्यांनी होणार्‍या निवडणूकीत त्यांची राजकीय कोंडी होण्याची शयता आहे. त्यामुळे सर्वच जण या लोकसभा निवडणूकीला गांभिर्याने घेतांना दिसून येत आहेत.