रायगड लोकसभेसाठी उद्या मतदान!निवडणूक यंत्रणा सज्ज! जिल्हाधिकारी जावळेंची माहिती

प्रचाराच्या तोफा थंडावल्या...नेते, कार्यकर्त्यांचा निःश्वास

By Raigad Times    06-May-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा रविवारी (५ मे) थंडावल्या आहेत. गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी व विरोधकांनी सोडली नाही. प्रचार शिगेला पोहोचला होता. ऐन उन्हाळ्यात निवडणुकांमुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते. ७ मे रोजी रायगडसाठी मतदान होणार आहे.
 
रायगड लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात प्रमुख लढत आहे. गेले महिनाभर या दोघांमध्ये जोरदार वाक्युध्द सुरु होते. कार्यकर्तेही जोरदार प्रचार करताना दिसत होते.
 
रविवारी (५ मे) निवडणुकीचा प्रचार समाप्त झाला आहे. यामुळे प्रचाराच्या तोफा
थंडावल्या आहेत. त्यामुळे उन्हातान्हातून प्रचारासाठी धुरळा उडवणार्‍या कार्यकर्ते तळवे गरम पाण्यात शेकवून घेणार आहेत.
नेत्यांच्याही घशाला आराम मिळणार आहे.रात्रीच्या घडामोडी लक्षात घेऊन निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. ७ मे रोजी मतदान होणार आहे.
उद्या मतदान..प्रशासन सज्ज!
मंगळवारी, ७ मे रोजी होणार्‍या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्ह्यातील १९० पोलीस अधिकारी,२ हजार ६० पोलीस कर्मचारी व १ हजार ४२५ होमगार्ड ६० आर.पी.सी, २३ युआरटी
तैनात केले असल्याची जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
 
रायगड मतदारसंघात१६ लाख ६८ हजार ३७२ मतदार आहेत.यामध्ये पुरुष ८ लाख २० हजार ६०५ आणि महिला ८ लाख ४७ हजार ७६३आणि तृतीयपंथी ४ आहेत. तर जिल्ह्यात २ हजार १८५ मतदान केंद्र आहेत.या व्यतिरीक्त केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी असून बंदोबस्त आराखड्यानुसार त्यांची विविध ठिकाणी तैनाती केली गेली आहे. जिल्ह्यात नियुक्त क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या वाहनांवर बिनतारी संदेश यंत्रणा बसविण्यात आली आहे.
संवेदनशील मतदान केंद्र
अलिबाग विधानसभा मतदार संघातील २ मतदान केंद्र, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील १ मतदान केंद्र, दापोली विधानसभा मतदार संघात १ तर गुहाघर विधानसभा मतदार संघात २ अशी एकूण ६ मतदान केंद्र ही क्रिटीकल पोलींग स्टेशन म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही.सदर क्रिटीकल पोलींग स्टेशनमध्ये अतिरीक्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे
पोलिसांकडून ६ गुन्हे दाखल
आचारसंहितेचा भंग केला म्हणून ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खारपाडा येथे एका महिलेने तपासादरम्यान
कॅमेरा फोडल्याने, दिघी सागरीमध्ये एका लग्नादरम्यान दोन ग्रुपमध्ये झालेले भांडण,महाडमध्ये १ तर मतदानासंदर्भात एक
ऑडीओ फिरत असल्याने सुओमोटो दाखल करण्यात आला आहे.