सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेला...हेलिकॉप्टर महाड येथे कोसळले!

By Raigad Times    04-May-2024
Total Views |
 mahad
 
महाड | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना महाड येथून बारामती येथे घेऊन जाण्यासाठी आलेले महालक्ष्मी रेडक्रॉस या मुंबईतील खासगी कंपनीचे हॅलिकॉप्टर चिचकर ग्राऊंडवर लँड होत असताना उडालेल्या धुळीच्या लोटामुळे जमिनीचा अंदाज न आल्याने हे हॅलिकॉप्टर ग्राऊंडवर कोसळले.
 
सुदैवाने हॅलिकॉप्टरचा पायलट नितीन व त्यांचा सहकारी विशाल हे बालंबाल बचावले त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुरुवारी रात्री महाड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा होती. ही प्रचार सभा आटोपल्यानंतर त्या महाड येथे वस्तीला होत्या.
 
mahad
 
आज सकाळी पावणे नऊ वाजता त्या हॅलिकॉप्टरने बारामती येथे एका महिला मेळाव्याला जाणार होत्या आणि तेथून पुन्हा मंडणगड येथील गीते यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहणार होत्या. सुषमा अंधारे यांनी महाड नगर परिषदेकडून हॅलिकॉप्टर चिचकर येथील ग्राऊंडवर लँड करण्याच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या.
 
पावणे नऊ वाजेपर्यंत हॅलिकॉप्टर येण्याच्या कोणत्याच हालचाली न दिसल्याने सुषमा अंधारे यांनी संबंधित एजन्सीला याबाबत विचारणा केली असता त्यांनी १० ते १५ मिनीटात हॅलिकॉप्टर येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे अंधारे या आपले भाऊ विशाल गुप्ते यांच्या समवेत चिचकर ग्राऊंड येथे पोचल्या. हॅलिकॉप्टरने तीन चार घिरट्या मारल्यानंतर ग्राऊंडवर खाली उतरत असताना धुळीचा मोठा लोळ उडाला आणि हॅलिकॉप्टर लँड न होता कोसळले.
 
मात्र सुदैवाने पायलट आणि त्याचा सहकारी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.दरम्यान, प्रशासनाकडून ज्या ग्राऊंडवर हॅलिकॉप्टर लँड होणार होते त्या ठिकाणी कोणतीही आखणी केली नव्हती. ग्राउंडवर पाणी मारलेले नव्हते त्यामुळे या अपघाताला प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.