मंदिरातील दानपेट्या फोडणार्‍या टोळीला बेड्या ; खोपोली, पनवेल, सावंतवाडी गोवा येथे चोर्‍या...

गोव्यात जाऊन खोपोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By Raigad Times    03-May-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | कोकणातील विविध मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारणार्‍या टोळीला खोपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून ७ लाख २ हजार ८०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ
घार्गे यांनी दिली. रायगडसह पनवेल, गोवा ते सावंतवाडी पट्ट्यात या चोरट्यांनी मंदीरातील दानपेट्या चोरल्या होत्या.
 
खोपोली येथील तेज फार्महाऊस जवळील बहिरी देव मंदिर आणि शिळफाटा-खोपोली येथील श्री हनुमान मंदिरात २५ आणि २६ एप्रिल २०२४ रोजी रात्री लागोपाठ चोर्‍या झाल्या होत्या. बहिरी देव मंदिराच्या दानपेटीतून १० हजार रुपयांची रक्कम तर हनुमान मंदिराच्या दानपेटीमधून ८ हजार रुपयांची रक्कम चोरी गेल्या होत्या. त्याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात भादविसंक. ४५७,३८० व भा.द.वि.सं.क.४५७,३८० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
 
लागोपाठ मंदिर चोरीचे गुन्हे होत असल्याने एक प्रकारे चोरट्यांनी खोपोली पोलिसांना आव्हानच दिले होते. घटनांचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चोरट्यांचा माग काढायला सुरुवात केली. खोपोली येथून पनवेल येथे चोरटे असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली होती.
 
मात्र त्यांच्यावर झडप मारण्याआधीच ते निसटून गोव्याला पसार झाले होते.खोपोली पोलिसांच्या टिमने गोवा गाठल्यानंतर म्हापसा, येथे एका मोठ्या मंदिरामध्ये मोठ्या रक्कमेची चोरी झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली. ही चोरी देखील याच चोरांनी केल्याची खात्री झाली.
 
मात्र ही चोरी केल्यानंतर चोरटे सावंतवाडीला गेले होते. खोपोली पोलीसांचे तपास पथक सावंतवाडी येथे पोहोचले व तेथे चारही चोरांना शिताफीने बेड्या ठोकल्या.राजू फरत शेख, (वय-२७ वर्षे,(बांग्लादेश), इम्रान शहीद शेख, (वय-२४ राहणार सुरत, गुजरात), राकीब कुलमोहंमद शेख, (वय-२८,राहणार सरत, गुजरात),आणि मुजाहिद गुलजार खान, (वय-२८ वर्षे,मुळ राहणार झारखंड) अशी या चोरट्यांची नावे आहेत.
 
इम्रान आणि राकीब हे दोघेही मुळ राहणार बांग्लादेशचे असल्याचा अंदाज असून त्यादृष्टीने तसा तपास ही सुरु आहे.त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये आतापावेतो एकूण ७ लाख २ हजार ८०० रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.यातील राजू फरत शेख याने त्याच्या वाट्याला आलेल्या रक्कमेपैकी १ लाख ३३ हजार रुपये इतकी रक्कम नातेवाईकाच्या बांग्लादेश येथील एका बँक अकाऊंटमध्ये जमा केली आहे.चारही चोरटे मागील चार वर्षापासून वेठबिगारीच्या कामासाठी सीबीडी बेलापूर येथे व्यास्तव्यास असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगीतले.