खडी क्रशरच्या सुरुंगाच्या हादर्‍याने खानाव गाव हादरले; घराच्या भिंतींना तडे

By Raigad Times    25-May-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | खालापूरातील खानाव गावाजवळील खडी क्रशरवर गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेत लावल्या जाणार्‍या सुरुंगामुळे खानाव गाव, आदिवासीवाडी हादरली आहे. येथील अनेक घराच्या भिंतींना तडे गेले असून, खिडयांच्या काचा फुटून, घराच्या लाद्या, टाईल्स निघून लाखोंचे नुकसान झाले आहे.
 
याप्रकरणी क्रशर मालकावर कारवाई करुत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे. खानाव गावाच्या काही अंतरावर भाई शिंदे, आप्पा शिंदे यांची खडी क्रशर आहे.खडी क्रशरवर गेल्या तीन दिवसांपासून रात्री किंवा पहाटेच्या वेळेत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे.
 
khopoli
 
खडी आणि ग्रीट गोदरेज आणि गावाजवळील पुलाच्या कामासाठी वापरली जात आहे. खडी क्रशरच्या सुरुंगामुळे गावात मोठे नुकसान होत असल्यामुळे कमी तीव्रतेचे सुरूंग लावण्याची विनंती ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे सदस्य आप्पा शिंदे यांच्याकडे केली होती. मात्र तरीही नियम ढाब्यावर बसवत गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेत सुरुंग लावले जात आहेत.
 
सुरुंगाच्या हादर्‍याने खानाव गाव, आदिवासीवाडीतील अनेक घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. खिडयांच्या काचा फुटल्या आहेत. घराच्या लाद्या, टाईल्स निघाली आहेत. यामुळे गोरगरीब आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाल्याचे संरपच गीता रोहिदास वाघमारे,उपसरपंच मंगेश देवराम पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी भाई शिंदे आणि आप्पा शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थ अनंत विष्णू घोंगे यांनी केली आहे.
 
खडी क्रशरच्या सुरूंगाच्या हादरयाने माझ्या घराचे नुकसान होत असल्याचे ग्रामसभेत सांगितले होते. तरीही सुरुंग लावल्यामुळे माझ्या घराच्या भिंतींना तडे गेलेत, लाद्या निघाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मी एक विधवा स्त्री आहे. रोजगार नाही आता कोण नुकसान भरपाई देणार? असा सवाल ज्योती सुधीर पाटील यांनी केला आहे.
 
खालापूर तालुयातील खडी क्रशरवर कारवाई झाली तेव्हापासून भाई शिंदे यांची खडी मशीन बंद आहे. परंतु ते खडी मशीनजवळ खड्डा करून सुरूंग लावत असल्याने कमी तीव्रतेचे सुरूंग लावण्याची विनंती तीन महिनाभरापूर्वी ग्रामसभेत ग्रामपंचायतीने केली. तरीही सुरुंग लावल्यामुळे खानाव गाव, आदिवासी वाडीतील घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याविरोधात आता कायदेशीर लढाई लढणार असल्याचे ग्रामस्थ भूषण पाटील यांनी सांगितले आहे.