खालापूरात चोरट्यांचा धुमाकूळ , धामणी गावात सात घरफोड्या

By Raigad Times    25-May-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली । खालापूरात विजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने अंधाराचा फायदा घेत धामणी गावात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 7 घरफोड्या केल्या. बियर शॉपीसह दुकाने फोडत, सोनेचांदीच्या वस्तू, मोटारसायकलही चोरट्यांनी लंपास केली आहे. शुक्रवारी (24 मे) पहाटे अंदाजे तीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करत धुमाकूळ घातला.
 
येथील दिनेश लोते हे रात्रपाळीला कामावर गेले होते, तर त्यांची पत्नी माहेरी गेल्याने घरात कोणीच नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून 3 तोळ्यांचे गंथन, अंगठी, दोन कानातले जोड, रोख पंधरा हजार रक्कम असा ऐवज चोरुन नेला.
 
त्यानंतर रस्त्याला लागूनच संतोष महाडिक यांचे कटलरी व किराणा मालाचे दुकान फोडले. या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम आणि छत्र्या व कटलरी सामान चोरले. त्यानंतर चोरट्यांनी धामणी बौद्धवाडीकडे मोर्चा वळविला. येथील नरेश नाराययण मनेर यांची घरासमोर उभी केलेली पल्सर मोटारसायकल चोरली.
 
तसेच कल्पेश भोजने यांच्या घराचा कडीकोंयडा तोडून घरातील चांदीच्या जोडव्या, पैंजण व रोख रक्कम साडेचार हजार घेऊन पोबारा केला. समीर शिंगवा यांचेही घर फोडले तसेच विजय मनेर यांच्या घरातील डेकोरेशनच्या दोन नवीन पाण्याच्या.मोटारही गायब केल्या.
 
त्यानंतर गावाबाहेर असणारी प्रचिती बियर शॉपी फोडून 8 हजार 400 रुपये रोकड चोरली. तसेच बिअर पिऊन, काही बॉटलही लंपास करत, चोर पसार झाले. पहाटे हा प्रकार समोर आल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. तात्काळ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी धामणी गावात दाखल झाले. पाहणी केली करत, याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल रकण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.