खोपोली | लौजी गावातील इमारत कोसळली ; सुदैवाने जीवितहानी नाही; धोकादायक इमारतीचा सर्व्हे करण्याची मागणी

By Raigad Times    15-May-2024
Total Views |
khopoli
 
खोपोली | खोपोलीतील लौजी गावातील शिवशक्ती इमारत मंगळवारी (१४ मे) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली. तळमजला अधिक तीन मजले अशा स्वरुपाची ही इमारत होती. या इमारतीमध्ये कोणी राहत नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
नगरपालिकेने धोकादायक इमारतीचा सर्व्हे करावा,अन्यथा विकासकाच्या चुकीमुळे नागरिकांना जीव गमवावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.खोपोलीतील लौजी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या गामा रियालिटीज या कंपनीच्या गणेश माने (चेंबूर) यांनी २००८ साली ही इमारत बांधली होती. जमीनमालक आणि इमारत विकासक यांच्यामध्ये वादविवाद सुरू असल्याने ही इमारत पडीक राहिली. तिच्यामध्ये कोणीही राहत नव्हते.
 
ही इमारत तकलादू असल्याची माहिती जागामालक यांनी नगरपालिका प्रशासनास दिल्याचे सांगण्यात आल्याने धोकादायक इमारतीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आले होते.सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान वादळा वारा सुटला होता.
 
मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अचानक ही शिवशक्ती इमारत कोसळली. याची बातमी वार्‍यासारखी पसरताच सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते.घटनास्थळी सर्व यंत्रणा दाखल झालेल्या असून त्यामध्ये कोणीही अडकले नसल्याचे खात्री करण्यात आली आहे. खोपोली फायर ब्रिगेड आणि इतर तांत्रिक यंत्रणांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सकाळी नगरपालिका प्रशासनाने आसपासची साफसफाई केली तर या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून तो पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.