महाड वाळू डेपोतील डंपर चालकाने वृद्धाला चिरडले ! मुठवली ग्रामस्थ संतापले, डेपो बंद करण्याची मागणी

09 Apr 2024 12:37:57
 mahad
 
महाड | महाड तालुक्यातील मुठवली येथील वाळू डेपोमधील डंपरने एका वृद्ध ग्रामस्थाला चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. महाड पोलीसांनी डंपर चालक सज्जाद समद पठाण याला अटक केली आहे.मुठवली गावचे वयस्कर शेतकरी रामचंद्र तुकाराम डावरुंग हे सोमवारी (८ एप्रिल) सकाळी आपल्या गुरांसाठी विहिरीवरून पाणी घेण्यासाठी गेले असता, डंपर चालक सज्जाद पठाण याने त्यांना गाडीखाली चिरडले.
 
चालकाने गाडी रिव्हर्स गिअरमध्ये चालविल्याने हा अपघात झाला.त्यातच रामचंद्र यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती मिळताच मुठवली ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. सर्व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत डेपोचे कामकाज सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला.
 
यावेळी घटनास्थळी डीवायएसपी शंकर काळे, तहसीलदार महेश शितोळे, पोलीस निरीक्षक रमेश तडवी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.पोलिसांनी डंपर चालक सज्जाद, राहणार देशमुख मोहल्ला यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भादवी कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी हे करीत आहेत.
 
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी सोमनाथ ओझर्डे, प्रफुल्ल धोंडगे, चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मयत रामचंद यांच्या मालकीच्या जागेवरून कोणाचा तरी दबाव होता. त्यामुळे हा अपघाताचा बनाव रचला असण्याची शक्यता असल्याचे या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0