पर्यटकांच्या स्वागतासाठी मुरुड जंजिरा सज्ज ! रस्ता होतोय सुसाट, समुद्रकिनारी वातानुकूलित हॉटेलची मागणी वाढली

By Raigad Times    09-Apr-2024
Total Views |
 Murud
 
मुरुड जंजिरा | शाळांना सुटट्या पडायला लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटक सहकुटूंब पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. पर्यटकांसाठी अलिबागसह मुरुड-जंजिरा आवडते ठिकाण आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी मुरुड जंजिरा सज्ज झाला आहे.
 
विशेष म्हणजे मुरुड रस्त्याचेही काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे पर्यटकांचा प्रवासदेखील सुकर होणार आहे.मुरुड शहरात सध्या पारा सकाळी ३२ अंशांवर असतो. सकाळी थंड तर दुपारी गरम वातावरण असल्याने समुद्राच्या गार पाण्यात कुल कुल होण्यासाठी पर्यटक मुरुडला उन्हाळी सुट्टी मुरुडला एन्जॉय करणार.
 
Murud
 
त्यात नुकतेच सुरु झालेले वॉटर पार्क, समुद्रावरील बोटिंग, मिनी बाईक, उंट सवारी, सोबत ४०० वाहने पार्कींग होतील, अशी पार्किग सुरु झाल्याने पर्यटकांसाठी पर्वणी आहे. यावर्षी मुरुड शहरात रस्ते व बागा, किनार्‍यावरील भेळ पुरी, विविध चाट, नारळपाणी, याचा स्वाद घेण्यासाठी पर्यटक मुरुडकडे वळतात.मुरुड शहरात सायंकाळी आल्हाददायक व सुंदर वातावरण आहे. समुद्र शांत असल्याने मासेमारी चांगली होत असल्याने पर्यटकांना मनसोक्त ताजे मासे खाण्याचा आनंद घेता येणार आहे.
 
मे महिन्याच्या१५ तारखेपर्यंत मुरुडला ताजे मासे मिळणार. मुरुडसारखे चवदार मासे रायगडात कोठेच मिळत नाही. मुरुडला सुया मासळीचा बाजार मोठा असल्याने मुंबई पुणे कोल्हापूर येथील पर्यटक खरेदीसाठी येतात. सुके बोंबील, सुकट, खार सुरमई, सर्वात प्रसिद्ध ताजे सोडे याची खरेदी विक्री उन्हाळी सुट्टीत मोठ्या प्रमाणात होते.
 
मुरुड समुद्रकिनारी असलेली हॉटेल उन्हाळी सुटीसाठी सज्ज झालीत. समुद्रकिनारी असलेली सर्व हॉटेल गरम वातावरणामुळे वातानुकूलित करण्यात आलीत, नवनवीन चविष्ट पदार्थांचे स्टॉल्स हॉटेलसमोर लावण्यात आलेत. हॉटेलमध्ये लहान मुलांसाठी खेळणी तसेच खेळाचे साहित्य देण्याची सोय करण्यात आली आहे नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेल्या विश्राम धाम बागेचे नुतनीकरण केल्याने त्याचा लाभ येणार्‍या पर्यटकांना होणार आहे.
 
पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून ३ वेळा स्वच्छ करतात. मुरुडला असणारे जलदुर्ग जंजिरा व पद्मदुर्ग पर्यटकांसाठी सज्ज झालेत.मुरुडपासून जवळच असणारे गारंबी धारण, कुडे मांदाड लेणी, खोकरी, दत्तमंदिर या पर्यटनस्थळावर स्वछता करून खाण्यापिण्याचे स्टल करण्यात आलेत. सलग सुट्ट्या असल्याने पर्यटकांसाठी मुरुड तालुका सज्ज आहे.
 
सर्वात महत्वाचा साळाव ते मुरुड रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असल्याने पर्यटक खुश आहेत. लवकरच काशीद येथील रो रो जेटी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईतून २ तासांत काशीद व मुरुडला येता येणार आहे.पर्यटकांच्या स्वागतासाठी मुरुड तयार आहे. पिण्याचे पाणी, शहरातील रस्ते, आणि स्वच्छ समुद्रकिनारे देण्याकडे आमचे लक्ष आहे.
 
त्यामुळे पर्यटकांना त्रास होणार नाही. पर्यटकांनी समुद्रात जाताना भरती ओहोटी याचे भान ठेऊन समुद्राच्या लाटांचा सुरक्षित आनंद घेण्याचे आव्हान केले आहे.- पंकज भुसे, मुख्याधिकारी, मुरुड दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मी माझे कुटुंब मुरुडला येतो. समुद्र किनारी हॉटेलवर राहतो यावर्षी मुरुड शहरात खूप सुधारणा झाल्या आहेत. रस्ते चांगले झालेत. किनार्‍यावर बोटिंग, बाईक राईड, आणि १ दिवस पदामदुर्ग केला. दुसर्‍या दिवशी वॉटर पार्कमध्ये मजा केली, मुरुडकडे येणारे रस्ते खूपच सुधारलेत कार घेऊन यायला भीती वाटत नाही.- मयूर सारंगधर, पर्यटक, मुंबइ