आ.भरत गोगावले यांच्या दहशतीला कंटाळून निर्णय घेतल्याची माहिती

09 Apr 2024 12:10:22
mahad
 
महाड | महाडचे आमदार भरत गोगावलेंच्या दहशतीला कंटाळून आपण आपल्या कुटुंबासह ६ जून २०२४ रोजी आमदारांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.
 
यावेळी कल्पेश पांगारे यांनी सांगितले की ग्राम सभेत पिंपळवाडी ग्रामपंचायती मधील बेकायदेशीर कारभार चव्हाट्यावर आणल्याने त्याचा राग मनात धरून ३० एप्रिल २०२३ रोजी मला व माझ्या कुटुंबियांना गंभीर रित्या मारहाण केली. या संदर्भात पोलिसात तक्रार केल्याने त्याचा राग धरून गावातील त्यांचे हितसंबंधातील लोकांना हाताशी धरून दमदाटी करून उपसरपंच पदाचा राजीनामा दे अन्यथा बघून घेऊ अशी दमदाटी केल्याचे सांगितले.
 
आपण या देशाचा स्वतंत्र नागरिक असून कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा अधिकार आहे मात्र आपल्याला होत असलेल्या दमदाटी नंतर या राज्यात लोकशाही जिवंत आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. या दहशतीखाली जगण्याची सवय नसून जर शासन जर माझं संरक्षण करत नसेल तर मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी भारताचे राष्ट्रपती यांना केली असल्याचे पांगारे यांनी सांगितले.
 
आपल्या आजोबांपासून गोगावले व पांगारे कुटुंबियांचा वाद असून आपल्या वडीलांनाही अशाच प्रकारे धमकावले जात होते असे कल्पेश पांगारे यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0