सुनील तटकरेंचा सातबारा कोरा करणार; अनंत गीते कडाडले

03 Apr 2024 15:36:35
 mangaon
 
गोरेगांव । जिल्ह्यातील एकजण स्वतःला अघोषीत सम्राट समजतात, त्यांना वाटत आपणच मोठे राजकारणी आहोत, पण त्यांचा सातबारा फक्त रोहा तालुक्या पूरता मर्यदित आहे. या निवडणुकीत या सम्राटाचा सातबारा अनंत गीते कोरा करणार अशी घोषणाच शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केली आहे.
 
इंडिया आघाडीचे उमेदवार अंनत गीते यांच्या प्रचारासाठी गोरेगाव येथे आयोजित जनसंवाद बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणूक हि देशातील जनता आपल्या हातात घेणार असून, जनता हि हुकूमशाही पेक्षा लोकशाहीला अधिक महत्व देणार आहे त्यामुळे राज्यासह देशा मध्ये इंडिया आघाडीलाच प्रचंड यश मिळेल रायगडमधील जनता देखील या वेळेस ज्यांना धडा शिकवायचं आहे त्यांना योग्य तो धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
दरम्यान, म्हसळा येथेही गीते यांनी तटकरेंवर जोरदार टिका केली. 2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतच सुनील तटकरे यांना रायगडमधून हद्दपार करणार होतो पण त्यावेळी त्यांची हद्दपारी शेकाप नेते जयंत पाटील यांनी वाचवली. परंतु त्यांच्यात पाठीत तटकरे यांनी खंजीर खुपसला अशा या विश्वासघातक्याला रायगडची जनता धडा शिकवण्याची वाट पाहते आहे.
 
हा रायगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या या रायगडाने बेईमानी, फितुरी, गद्दारी त्यावेळीही खपवून घेणार नाही असा इशारा अनंत गीते यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा संपर्क नेते संजय कदम, जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे, स्नेहल जगताप, हनुमंत जगताप शेकापक्षाचे रमेश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद चंद्र पवार गटाचे) सदानंद येलवे, जिल्हा महिला संघटक स्वीटी गिरासे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0