राष्ट्रवादीचा शेकापला आणखी एक धक्का ; नंदू म्हात्रे यांच्यासह शेकाप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अनंत गीते यांना अनिकेत तटकरेंचा इशारा...म्हणाले, जशास तसे उत्तर देऊ

By Raigad Times    03-Apr-2024
Total Views |
 roha
 
रोहा । राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी शेकापचा मुरुड तालुक्यातील एक मोठा नेता फोडल्यानंतर मंगळवारी त्यांनी आणखी एक धक्का शेकाप नेते जयंत पाटील यांना दिला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, शेकापचे पदाधिकारी नंदू म्हात्रे यांना त्यांच्या गळाला लावले आहे. म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे शेकापला जोरदार झटका बसला आहे.
 
सुनील तटकरे पुन्हा एकदा लोकसभेची निवडणुक लढवत आहेत. गेल्यावेळी शेकापनेच त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा केला होता. यावेळी शेकाप त्यांच्या विरोधात काम करत आहे. तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर शेकापने महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना पाठींबा दिला आहे. यानंतर तटकरे-पाटील यांची जुगलबंदी सुरु आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तटकरे यांनी शेकापचे मुरुडचे नेते मनोज भगत यांना त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करुन घेतला. त्यावर पलटवार करताना, शेकापनेते जंयत पाटील यांनी, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांना मुरुड येथे आणून तटकरेंवर आसुड ओढले होते. आ. पाटील यांनीदेखील तटकरेंवर टिका करताना पातळी सोडली होती.
 
या घटनेला चार दिवस सरत असतानाच तटकरे यांनी पुन्हा एक धक्का शेकापला दिला आहे. त्यांनी शेकापचे जुने व ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू म्हात्रे यांच्यासह लक्ष्मण महाले यांना गळाला लावले आहे. मंगळवारी त्यांचा सुतारवाडी येथे पक्षप्रवेश करुन घेतला. हा पक्ष प्रवेश म्हणजे शेकापनेते आ. जयंत पाटील यांना दुसरा धक्का असल्याचे समजले जाते.
 
ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है...अशा शब्दात अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचण्याचा प्रत्यकेला आहे. तसेच अनंत गीते यांनाही त्यांनी सुनावले आहे. गीते यांची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय बोलावे त्यांना समजत नाही, त्यांची बुद्धी सुस्थितीत ठेवावी, अन्यथा जशास तसे उत्तर आम्ही देऊ असा इशारा अनिकेत यांनी गीते यांना दिला आहे.
 
दरम्यान, शेकापमध्ये दोन वर्षांपूर्वी प्रवेश केला, मन घुटमळत होते. आम्ही 20 ते 30 वर्ष राष्ट्रवादीत काम केले होते, आम्हाला जनतेत जाऊन काम करण्याची सवय आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांची उमेदवारी घोषित झालीय. त्यामुळे या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी, विजयी करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याची प्रतिक्रिया नंदू म्हात्रे यांनी दिली आहे.