सातीर्जे पुलावरून पाण्याचा टँकर कोसळला; चालकाचा मृत्यू, १ जखमी

By Raigad Times    29-Apr-2024
Total Views |
 alibag
 
सोगाव | अलिबाग तालुयातील आगरसुरे फाटा ते सातीर्जेकडे जाणार्‍या रस्त्यावरील पुलावरुन पाण्याने भरलेला टँकर खाली कोसळून झालेल्या अपघातात टँकरचालकाचा मृत्यू झाला असून, टँकर मालक गंभीर जखमी झाला आहे.याबाबत मांडवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२६ एप्रिल) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाण्याने भरलेला टँकर घेऊन चालक मंगेश दत्तात्रेय करळकर (वय ६१, रा.मुशेत) हे आगरसुरे फाटा ते सातीर्जे ह्या मार्गावरून जात होते.
 
पुलावरुन जाताना टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकरचा झोला जाऊन टँकर उजव्या बाजूला गेला आणि नदीवरील पुलाची लोखंडी रेलिंग तोडून पुलावरून खाली कोरड्या नदीपात्रात कोसळला. या अपघातात टँकरचालक मंगेश करळकर यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
 
तर टँकरमध्ये सोबत असलेले टँकरमालक योगेंद्र गोविंद नार्वेकर (वय ६५) हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही.लांडे यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमीला बाहेर काढून पिंट्या गायकवाड यांच्या रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी अलिबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.या अपघाताची फिर्याद आदिक मोहन नार्वेकर रा.चोंढी यांनी मांडवा पोलिसांना दिली असून अधिक तपास मांडवा पोलीस ठाण्याचे व्ही.जी.पाटील हे करीत आहेत.