रेवदंडा बाजारपेठेतील वाहतूक कोंडी ऐरणीवर;पार्कींग सुविधा नसल्याने समस्या

By Raigad Times    29-Apr-2024
Total Views |
 alibag
 
रेवदंडा | रेवदंडा बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या ऐरणीवर आली आहे.पार्कींग सुविधा नसल्याने खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात, त्यामुळे आधीच अरुंद असलेला हा रस्ता आणखीनच अरुंद होतो. त्यामुळे ही
समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.
 
अलिबाग, मुरुड व रोहा तालुयाला मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रेवदंडा बाजारपेठेत नेहमीच गर्दी असते. आजुबाजूच्या विविध गावांसह रेवदंडा, थेरोंडा,चौल, आग्राव आदी पंचक्रोशीतील ग्राहक खरेदीसाठी रेवदंडा बाजारपेठेत येतात. मात्र हा मुख्य रस्ता अरूंद असल्याने पार्कींगची समस्या प्रकर्षाने जाणवते.
 
बाजारपेठेत गर्दीच्या वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होते.विशेषतः रेवदंडा पारनायावरील भाजी मार्केटमध्ये विक्रेते व खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांची तोबा गर्दी होते. या गर्दीने वाहने जा-ये करण्यास अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते.रेवदंडा बाजारपेठेतील हा रस्ता अरुंद आहे. याच रस्त्याने मुरूड व अलिबागकडे वाहतूक सुरु असते.
 
प्रवासी एसटी बसेस,अन्य मोठी वाहने यांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. एका वेळेस दोन मोठी वाहने आली तर मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. ह्या गाड्या मार्गस्थ होईपर्यंत दोन्ही वाहतूक वाहने अडकून पडतात. शनिवार, रविवार
या गर्दीच्या दिवशी तर परिस्थिती आणखीनच बिकट बनते.
 
रेवदंडा बाजारपेठेतील वाहतूक कोंडी दुर व्हावी म्हणून चौल नाका येथून अवजड वाहनांची वाहतूक बायपास रस्त्याने वळवावी, अशी मागणी आहे. मात्र रेवदंड्यातील प्रवासीवर्गामुळे एस.टी.बसेस हा मार्ग बदलत नाहीत. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.