गुरे कत्तलीसाठी घेऊन निघालेला टेम्पो पकडला , चार बैलांची सुटका; अज्ञात वाहनाकडून टेम्पोवर दगडफेक, चालक फरार

पनवेल शिरढोण येथील कारवाई

By Raigad Times    29-Apr-2024
Total Views |
panvel
 
नवीन पनवेल | बैलांची तस्करी करणार्‍या संशयित टेंपोचा पाठलाग करुन टेंपो पकडण्यात आला आहे.टेंपो चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. गोरक्षकांनी टेंपोची पाहणी केली असता कारमध्ये चार बैल आढळून आले. त्यापैकी एक गंभीर अवस्थेत आढळून आला.घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेंपो आणि चार बैल ताब्यात घेतले असून संशयिताविरोधात पशू अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
टेम्पोमधून बैलांची तस्करी होणार असल्याची माहिती नवी मुंबईमधील गोरक्षक आणि विेश हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह मुंबई गोवा महामार्गवर पाळत ठेवली होती. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एका संशयित टेंपो भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आल्यानंतर टेंपोचा पाठलाग सुरू केला होता.
 
पनवेल तालुयातील शिरढोण परिसरात टेंपो गोरक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.तेव्हाच टेम्पोच्या आसपास असलेल्या एका काळ्या रंगाच्या वाहनातून टेंपोवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत टेम्पोची (एम.एच./ ०३/ इजी- २२३५) काच फुटली वत्याच दरम्यान टेम्पोचालक त्या काळ्या रंगाच्या वाहनातून फरार झाला.टेंपोजवळ पोहोचलेल्या गोरक्षकांनी टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये चार बैलांना बसण्यासाठी तसेच उभे राहण्याची जागा नसताना बैलांच्या मानेला आणि पायांना दोरीने घट्ट बांधून दाटीवाटीने कोंबण्यात आले होते.
 
पनवेल पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.पोलिसांनी चार बैल आणि टेंपो जप्त करून ताब्यात घेतली. टेंपोत गुंगीचे इंजेशनदेखील आढळून आले. टेम्पोमध्ये अँटी स्लीपरी मटेरीयर, चारा पाण्याची व्यवस्था, वेस्ट मटेरियल टँक, निमल फस्ट एड किट, सेपरेट पार्टिशन कंपार्टमेंट,वेटरनरी सर्जन यांचे हेल्थ सर्टिफिकेट आणि ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट न बाळगता जनावरांना गुंगीचे औषध देऊन वेदना होतील, अशा पद्धतीने बेकायदेशीर वाहतूक तसेच जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या कारवाईसाठी विक्रांत डिंगोरकर, चेतन देशमुख, किरण शिंदे, सचिन गायकवाड,अविनाश सापल्य, दर्शन आगाज, रूतिक गायकवाड, शैलेश जगनाडे यांच्यासह परेश मुरबाडकर आदींनी प्रयत्न केले. फरार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली.दरम्यान बैलांना पनवेलमधील पांजरपोळ येथे पाठवण्यात आले आहे.