रायगडात मत्स्य दुष्काळसदृश्य परिस्थिती;समुद्राचे पाणी तापले, मच्छी पळाली तळाला...

बाजारात शुकशुकाट;मच्छिमार संकटात

By Raigad Times    29-Apr-2024
Total Views |
korlie
 
कोर्लई| सातत्याने हवामानात होणारे चढ उतार, ग्लोबल वॉर्मिगचा फटका सर्वांनाच जाणवत आहे.प्रचंड उष्णतेमुळे समुद्राचे पाणी देखील तापत असल्याने समुद्रातील मासे समुद्राच्या तळाशी पळाले आहेत. परिणामी मच्छिचा दुष्काळ पडला असून मच्छिमारांवर संकट ओढवले आहे.
 
वारंवार होणारे हवामानातील बदल, याबरोबरच समुद्रातील वाढते जल प्रदुषण, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप, अवैध एलईडीपर्ससीन मासेमारीमुळे दिवसेंदिवस समुद्रातील माशांचे उत्पादन घटत चालले आहे. राज्याच्या ७२० कि.मी. लांबीच्या समुद्र किनाऱपट्टीवर असलेला दर्याचा राजा गेली कित्येक वर्षे मासळी दुष्काळाच्या कचाट्यात सापडत आहे.
 
korlie
 
सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत.भागांतून काही प्रजातींचे मासे इतरत्रस्थलांतरित होत आहेत. घोळ,जिताडा, शेवंड, बोंबील, मांदेली,कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे याचबरोबर इतर अनेक प्रजातींचे बाजारात दर्शन दुर्लभ झाले आहे. बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी मासेमारीच्या अतिरेकाचा मोठा परिणाम झाला आहे.
 
तसेच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत. तर काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत.जागतिक तापमान वाढीमुळेही माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहेत. मासे समुद्राच्या तळाशी पळाल्याने मासेमारी करणार्‍यांना रिकाम्या बोटी घेवून परत यावे लागत आहे.
 
दरम्यान, समुद्रात मिळणारी थोडीफार कोळंबी गायबच झाली,मोठी मासळी तर दिसेनाशी झाली आहे. याला जबाबदार अवैध एलईडी मासेमारी व पर्ससीन मासेमारी आहे.यांच्यामुळे समुद्रातील लहान सहान जीव नष्ट होत असल्याने उत्पादन घटत असल्याची प्रतिक्रीया रोहन निशानदार यांनी व्यक्त केली आहे.