शिवसेना शिंदे गटात आयाराम, गयाराम! माणगाव तालुका चिटणीस;रमेश मोरेंचा शेकापला रामराम

आज माणगाव येथे शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश

By Raigad Times    29-Apr-2024
Total Views |
mangoan
 
माणगाव | शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी शेकापला रामराम ठोकला आहे. ते सोमवारी (२९ एप्रिल) रोजी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. शेकापचे दक्षिण रायगडचे युवा नेते म्हणून मोरे यांच्याकडे पाहिले जात होते.
 
त्यांनी राजीनामा दिल्याने शेकापला मोठा धक्का बसला आहे.महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रमेश मोरे यांनी रविवारी (२८ एप्रिल) माणगांव येथे पत्रकार परिषदेत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. तसेच सोमवारी, २९ एप्रिल रोजी कुणबी भवन येथे कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार असल्याचेही सांगितले.रमेश मोरे हे आ. जयंत पाटील यांच्या अत्यंत विश्वासातले मानले जात असत.
 
विशेष म्हणजे चार दिवसांपर्यंतते त्यांच्यासोबत दिसत होते. शरद पवार यांच्या सभा आयोजनातही त्यांचा सहभाग होता. मात्र रविवारी त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.आ. भरत गोगावले हे माणगांव तालुयात विकास कामे करीत असून,जात, पात आणि पक्ष न पाहता ते कामे करीत आहेत.
 
माझ्या मोर्बा मतदारसंघात आ. भरत गोगावले यांनी सुमारे दीड कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. या विकासकामांवर प्रभावित होऊन त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती मोरे यांनी यावेळी दिली.आ. भरत गोगावले म्हणाले की,रमेश मोरे यांना विकासकामे करण्यात कोणत्याही प्रकारचा विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही.
 
त्यांचा शिवसेना पक्षात योग्य तो सन्मान करण्यात येईल आणि त्यांना मानाचे पद देण्यात येईल.रमेश मोरे यांच्याबरोबर मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघातील बहुतेक सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रमेश मोरे हे कुणबी समाजाचे युवा नेतृत्व असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.याचा फायदा लोकसभेसाठी सुनील तटकरेंना होणार असे दिसत आहे.