देशातील लोकशाही वाचविण्यासाठी अनंत गीतेंना मत द्या- आ. पोतनीस

27 Apr 2024 15:51:55
 alibag
 
अलिबाग | देशातील विरोधक संपवून एकहाती सत्ता निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप संविधान विरोधी भूमिकेतून काम करीत आहेत. आता देशातील लोकशाही वाचविण्याची गरज निर्माण झाली असून, संविधान वाचविण्यासाठी शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना निवडून द्या, असे आवाहन आमदार संजय पोतनीस यांनी केले आहे.
 
महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शेतकरी भवन येथे इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि.२५) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे, प्रदिप नाईक, अ‍ॅड. गौतम पाटील, पिंट्या ठाकूर, कविता ठाकूर, समीर ठाकूर, कमलेश खरवले, संदीप पालकर, अजय झुंजारराव आदी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
आ. पोतनीस म्हणाले की, भाजपसोबत असताना शिवसेनेला नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचे काम भाजपने केले आहे. त्यांनी शिवसेनेला संपविण्याचा घाट घातला. शिवसेना फोडण्याचे काम केले. हुकूमशाही निर्माण करण्याची भाजपची भूूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान काढून त्याठिकाणी स्वतःच्या मर्जीने सत्ता निर्माण करण्याच्या हालचाली सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते सहा वेळा खासदार झाले. त्यात केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केले आहे. मात्र, त्यांनी कधीही पदाचा दुरुपयोग केला नाही. प्रामाणिक नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. या निवडणूकीत त्यांना बहूमतांनी निवडून द्या, असे आवाहनही यावेळी आ. पोतनीस यांनी केले.
 
दरम्यान, २०२४ ची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. जर आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ठामपणे मत दिले नाही तर कदाचित ही निवडणूक शेवटची निवडणूक ठरू शकेल. कदाचित २०२९ पासून निवडणूका होणारही नाहीत, अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनंत गिते यांना निवडून आणण्यासाठी आपण धगधगती मशाल पेटवली आहे. निश्कलंक व्यक्तीमत्व म्हणून अनंत गीते यांना निवडून द्यायचे आहे. असा निर्धार आपण करुया असे आवाहन अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0