यंदा पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस मोठी भरती

26 Apr 2024 18:00:18
 alibag
 
अलिबाग | कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शयता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे.
 
यावर्षी पावसाळ्यात मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागा मार्फत जाहीर केले जाते. या दिवशी मच्छीमारांना तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले जात असतात.यावर्षी पावसाळ्यात २२ दिवस मोठी उधाण येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
यात जून मधील सात, जुलै मधील चार, ऑगस्ट मधील पाच, आणि सप्टेंबर मधील सहा दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडे चार मीटर पेक्षा अधिक मोठी भरती येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनर्‍यावरील गावांना आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
रायगड जिल्ह्यात नदी, खाडी आणि समुद्र किनार्‍यावर एकूण ३८५ गावे आहेत. या गावांना स्थानिक पातळीवर नियोजन करण्याबाबतचे आदेश रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत. या कालावधीत समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे शेतात खारेपाणी शिरून जमीन नापीक होऊ शकते. याच कालावधीत अशातच मोठा पाऊस झाल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडसर होतो. ज्यामुळे नद्या, नाल्यांना पूर देखील येऊ शकतो.
मोठ्या भरतीचे दिवस
जून महिन्यात ५ ते ८, २३ ते २५
जुलै महिन्यात २२ ते २५
ऑगस्ट महिन्यात १९ ते २३
सप्टेंबर महिन्यात १७ ते २२
Powered By Sangraha 9.0